कोरोना लस आल्यापासून दिलासा मिळाला असताच आता देशात एक नवीन संकट उभे ठाकले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूने (Bird Flu) थैमान घालायला सुरुवात केली आहे. राजस्थाननंतर मध्य प्रदेश, हिमाचल, पंजाब आणि केरळमध्ये बर्ड फ्लूची भीती पसरली आहे. या आजाराचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. केरळ राज्याने ‘बर्ड फ्ल्यू’ला ‘राज्य आपत्ती’ (State Disaster) घोषित केले आहे. राजस्थानमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूनंतर अलर्ट जारी करण्यात आला असून, झालावाड येथील एक किलोमीटर क्षेत्रात कर्फ्यू लागू करण्यात आला. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, 1700 पेक्षा जास्त परदेशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे होणाऱ्या या आजारामुळे केवळ पक्षीच नव्हे तर मानवही संक्रमित होऊ शकतो. बर्ड फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि एच 5 एन 1 विषाणूमुळे श्वसन प्रणालीवर त्याचा परिणाम होतो, म्हणून हा आजार धोकादायक समजला जातो. 23 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान मध्य प्रदेशात 376 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक 142 मृत्यू इंदूरमध्ये झाले. याशिवाय मंदसौरमध्ये 100, आगर-मालवामध्ये 112, खरगोन जिल्ह्यात 13, झीहोरमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशच्या कांगड़ा येथील पोंग धरण तलावामध्ये हजारो स्थलांतरित पक्षी मरण पावल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर या पक्षांची चाचणी केली असता ती बर्ड फ्ल्यूसाठी सकारात्मक आली आहे. या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे दिसून आले आहे. मरण पावलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या एका प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, ज्याच्या अहवालात एच 5 एन 1 (बर्ड फ्लू) ची पुष्टी झाली आहे. बर्ड फ्लूच्या निदानानंतर प्रशासनाने धरणाजवळील मांस व अंडी विक्रीवर बंदी घातली आहे. (हेही वाचा: कावळ्यानंतर आता स्थलांतरित पक्षांचा सुद्धा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने खळबळ)
हरियाणाच्या बरवाला भागात रहस्यमय कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे या भागात एव्हीयन फ्लूची भीती वाढली आहे. येथे सुमारे एक लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी 5 डिसेंबरपासून कोंबड्यांचा मृत्यू व्हायला सुरुवात झाली. केरळच्या कोट्टायम आणि अलाप्पुझा जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे बाधित क्षेत्रात आणि आजूबाजूच्या एक किलोमीटरच्या भागात जवळजवळ 50,000 कोंबड्यांना आणि इतर पाळीव पक्ष्यांना मारून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.