Bank Merger विरोधात बँकिंग क्षेत्रातील दोन प्रमुख संघटनांचा 27 मार्च रोजी संप; सलग तीन दिवस बंद राहणार बँका
The strike | File Image | (Photo Credits: PTI)

बँकिंग क्षेत्रातील दोन प्रमुख संघटना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन (AIBOA) यांनी 27 मार्चपासून बँकेचा संप (Bank Strike) पुकारला आहे. 10 मोठ्या बँकांना एकत्र (Merger of PSU Banks) करून 4 बँका तयार करण्याचा निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर हा संपाचा निर्णय घेण्यात आला. 27 मार्च ते 29 मार्च असा तीन दिवसांचा बँकांचा संप असणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मेगा बँक विलीनीकरणासाठी परवानगी दिली होती.

बँकांचा हा संप 27 मार्च रोजी होणार असून, 28 मार्च रोजी चौथा शनिवार व पुढे 29 मार्च रोजी रविवार असल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. यापूर्वी 11 मार्च रोजी युनियनने तीन दिवसीय देशव्यापी संपाची घोषणा केली होती. परंतु नंतर बँक कर्मचाऱ्यांनी संपाला स्थगिती दिली. मुंबईत भारतीय बँकांच्या संघटनेबरोबर (आयबीए) झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

आता आपल्या मागण्या मान्य न झाल्यास 1 एप्रिलपासून देशभरात अनिश्चित काळासाठी संप केला जाईल, असे संघटनेने म्हटले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये, 10 पीएसयू बँकांचे प्रस्तावित विलीनीकरण थांबविणे, आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण, बँकिंग सुधारणांचे रोलबॅक, बेड कर्जाची वसुली आणि ठेवीवरील व्याज दरात वाढ होणे यांचा समावेश आहे. (हेही वाचा: RBI कडून Yes Bank वर 5 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत स्थगिती; ठेवीदार खात्यातून काढू शकणार फक्त 50,000 रुपये)

याव्यतिरिक्त बँक अ‍ॅम्प्लॉयज फेडरेशन ऑफ इंडियाने विलीनीकरणाच्या विरोधात 15 दिवसांच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. वित्त मंत्रालयाने 10 ऑगस्ट 2019 रोजी 10 सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने बँकांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली. त्यानंतर, देशभरातील सरकारी बँकांची संख्या जवळपास 12 होईल, याआधी ती 27 होती.

दरम्यान, या महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये 5 रविवार आणि दोन शनिवार व्यतिरिक्त एक दिवस होळी आणि एक दिवसाचा संप यांचा समावेश आहे, अशाप्रकारे मार्चमध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहतील.