गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर भारताने आपली खास ओळख निर्माण केली आहे. विविध क्षेत्रामधील भारताची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. आता पुढील वर्षीच्या जगातील 8 महान शक्तींच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे. नुकतेच, 2024 च्या शेवटच्या महिन्यात, डिसेंबरमध्ये जाहीर झालेल्या या ताज्या यादीत भारताने ब्रिटन, फ्रान्स आणि दक्षिण कोरियासारख्या देशांना मागे टाकले आहे. ही ताजी यादी आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रभाव, राजकीय स्थैर्य आणि लष्करी ताकदीच्या आधारे तयार करण्यात आली आहे.
अमेरिकन मासिक 19fortyfive यांनी 'द एट ग्रेट पॉवर्स ऑफ 2025' (The Eight Great Powers of 2025) या नावाने जाहीर केलेल्या या यादीत महासत्ता अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर या यादीत चीनला दुसरे स्थान मिळाले आहे. रशिया तिसऱ्या, जपान चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर या यादीत भारताला पाचवे, फ्रान्सला सहावे, ब्रिटनला सातवे आणि दक्षिण कोरियाला आठवे स्थान मिळाले आहे. ही यादी डॉ रॉबर्ट फार्ले यांनी तयार केली आहे. डॉ. फार्ले अमेरिकेच्या पॅटरसन स्कूलमध्ये सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी शिकवतात.
युरेशिया टाईम्सच्या वृत्तानुसार, यादीत चीनचा क्रमांक वाढला असला तरी अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाही रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीचे वैशिष्ट्य पाहिल्यास त्यात आशियातील 4 देशांचा समावेश आहे, जे जागतिक स्तरावर आशियाचे वर्चस्व दर्शवते. गेल्या 500 वर्षांत पाश्चात्य देशांनी जागतिक शक्ती म्हणून आपला प्रभाव कायम ठेवला. गेल्या शतकात अमेरिकेने निर्णायक भूमिका बजावली. त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्र या शतकात निर्णायक भूमिका बजावेल.
जगातील 8 महान शक्तींमध्ये भारताने पाचवे स्थान पटकावले असून या यादीत त्याला 'नवागत'चा दर्जा देण्यात आला आहे. भारताची लोकसंख्या खूप चांगली आहे, असे म्हटले जाते. याशिवाय भारताचा आर्थिक प्रगती दर या यादीत समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. या यादीमध्ये म्हटले आहे, अमेरिकेकडे जगातील सर्वात घातक आणि व्यापक संरक्षण आस्थापना आहे. जगातील कोणत्याही खंडात कधीही लष्करी कारवाई करण्याची ताकद केवळ अमेरिका या एकमेव देशाकडे आहे. (हेही वाचा: India's Retail Inflation Rates: नोव्हेंबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाईत 5.48% पर्यंत घसरण)
चीनला दुसरे स्थान देण्यात आले असले तरी लोकसंख्या घटल्याने त्याचा वाईट परिणाम झाला आहे. त्यात असेही म्हटले आहे की, चीन आणि अमेरिका यांच्यातील तांत्रिक अंतर कमी होत आहे आणि चीन आपली अर्थव्यवस्था आणि संरक्षण औद्योगिक पाया सतत विस्तारत आहे. रशियामध्ये नैसर्गिक संसाधनांचा साठा आहे. रशियाची लोकसंख्या जास्त शिक्षित आहे. रशियाकडे अजूनही भरपूर अणुबॉम्ब आहेत आणि ते कोणत्याही निर्बंधाशिवाय युक्रेनमध्ये आपली मोहीम राबवत आहेत.