प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरस (Coronavirus) वर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, या धोकादायक विषाणूचा रुग्ण (COVID-19 Patients) 11 दिवसांनंतर दुसर्‍यास संक्रमित करू शकत नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, कोरोना विषाणू संक्रमित व्यक्ती लक्षणे दर्शविण्याच्या दोन दिवस आधी या धोकादायक विषाणूचा संसर्ग पसरवू शकते. सिंगापूर (Singapore) मधील संशोधकांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण लक्षणे दिसल्यावर सात ते दहा दिवसामध्येच हा संसर्ग पसरवू शकतात. म्हणूनच अशा रुग्णांना 11 व्या दिवसापासून अलिप्त ठेवण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.

सिंगापूरमधील नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्टीव्ह डिजीज (National Centre for Infectious Diseases) आणि अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिसिन (Academy of Medicine) मधील शास्त्रज्ञांनी, कोरोना विषाणूच्या 73 रूग्णांची तपासणी केली. यापैकी बहुतेक रुग्ण 2 आठवड्यांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह होते, परंतु इतरांना संसर्ग देण्यास ते सक्षम नव्हते. संशोधकाने म्हटले आहे की, कोरोना विषाणूची लागण झाल्यापासून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये, संसर्गाचा कालावधी हा लक्षणे सुरू होण्याच्या दोन दिवस आधी सुरू होतो आणि तो 7 ते 10 दिवस टिकतो. संक्रमित व्यक्ती या  त्यांच्या लक्षणांच्या पहिल्या आठवड्यात अधिक लोकांना संक्रमित करू शकतात. (हेही वाचा: COVID19 च्या लढाईसाठी भारताचे INS केसरी जहाज औषध आणि अन्य मदतीसाठी मॉरिशस मधील लुईस पोर्ट येथे दाखल)

सिंगापूरमध्ये, नियमांनुसार, 24 तासांच्या कालावधीत दोन स्वॅबच्या चाचण्या नकारात्मक आल्यावरच  संक्रमित रुग्णाला सोडण्यात येते. एनसीआयडीच्या मते, जर स्वॅब टेस्टचा अहवाल सकारात्मक असेल तर याचा अर्थ असा नाही की, संक्रमित व्यक्ती इतरांना या रोगाचा संसर्ग देऊ शकते. या आधी जर्मनीमाध्येहीच असाच शोध लावण्यात आला होता. सुरुवातीला रुग्णामध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असते, मात्र नंतर ते कमी कमी होत जाते.