PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

देशात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी खुशखबरी आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासाठी एकूण 13,554.42 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सरकारने सोमवारी ही माहिती दिली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) सांगितले की ही योजना पाच आर्थिक वर्षांत 40 लाख लोकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

ही योजना 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी म्हणजेच 2021-22 ते 2025-26 या पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. पीएमईजीपीचे उद्दिष्ट बिगरशेती क्षेत्रात सूक्ष्म उद्योग उभारून देशभरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे.

या योजनेची कालमर्यादा वाढवण्याबरोबरच त्यात आणखी काही सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत, उत्पादन युनिट्ससाठी कमाल प्रकल्प खर्च सध्याच्या 25 लाख रुपयांवरून 50 लाख रुपये करण्यात आला आहे. त्याच वेळी, सेवा युनिट्ससाठी ते 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आले आहे.

पीएमईजीपीमध्ये ग्रामोद्योग आणि ग्रामीण क्षेत्राच्या व्याख्याही बदलण्यात आल्या आहेत. पंचायती राज संस्थांच्या अंतर्गत येणारे क्षेत्र ग्रामीण क्षेत्र म्हणून ओळखले जाईल. महानगरपालिका अंतर्गत येणारे क्षेत्र नागरी क्षेत्र म्हणून ओळखले जाईल. सर्व अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना अर्ज प्राप्त करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची परवानगी असेल, मग तो अर्ज ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातून. आकांक्षी जिल्हे आणि 'ट्रान्सजेंडर' अर्जदारांना एका विशेष श्रेणीमध्ये ठेवले जाईल आणि ते अधिक अनुदान मिळविण्यास पात्र असतील.

या योजनेत कर्जाचे दोन प्रकार आहेत –

सर्व्हिस सेक्टर लोन– जर तुम्हाला तुमचा अशा कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल जो सेवा पुरवतो त्यासाठी तुम्ही पीएमईजीपी अंतर्गत सेवा कर्जासाठी अर्ज करू शकता.

मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लोन - तुम्हाला तुमचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल जो मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर तुम्ही पीएमईजीपी अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग लोनसाठी अर्ज करू शकता. (हेही वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लान)

किती मिळेल कर्ज?

तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्रावर अवलंबून असते. जर तुमचा व्यवसाय सेवा क्षेत्रात असेल तर तुम्हाला पीएमईजीपी अंतर्गत 10-15 लाखांपर्यंत कर्ज मिळते. जर तुमचा व्यवसाय उत्पादन क्षेत्रात असेल तर तुम्हाला पीएमईजीपी अंतर्गत 20-25 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.