Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. लसीकरण मोहिमेवर भर देण्याबरोबरच केंद्र सरकार राज्यांसाठी दररोज नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करत आहे. आता भारत बायोटेकने (Bharat Biotech) त्यांच्या कोवॅक्सीन (Covaxin) लसीबाबत मोठा दावा केला आहे. भारत बायोटेकचे म्हणणे आहे की कोवॅक्सीन लसीचा बूस्टर डोस करोनाच्या ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही प्रकारांवर मात करण्यास सक्षम आहे. याआधी शनिवारी, भारत बायोटेकने सांगितले की कोवॅक्सीनच्या बूस्टर डोसच्या चाचणीमध्ये कोणतेही दुष्परिणाम आढळले नाहीत आणि ते व्हायरसच्या सर्व प्रकारांपासून दीर्घकालीन संरक्षण देते.

भारत बायोटेकने एका निवेदनात म्हटले होते की, चाचणी दरम्यान, बूस्टर डोस घेतल्यानंतर, दोन डोस घेण्याच्या तुलनेत लोकांमध्ये अँटीबॉडीज 5 पटीने वाढल्या. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बूस्टर डोस घेतल्यानंतर लोकांमध्ये CD4 आणि CD8 पेशींमध्ये वाढ झाली. यामुळे, कोवॅक्सीन कोरोना विषाणूपासून दीर्घकाळ संरक्षण देते. चाचणी दरम्यान साइड इफेक्ट्सचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून आले.

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचा वापर 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्यासाठी केला जात आहे. अलीकडेच भारत बायोटेकने म्हटले आहे की फेज II आणि III च्या अभ्यासात त्यांची कोवॅक्सिन सुरक्षित, सहनशील आणि दोन ते 18 वर्षे वयोगटातील प्रतिकारशक्ती वाढवणारी असल्याचे आढळले आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांच्या मते, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये कोवॅक्सीनच्या क्लिनिकल चाचण्यांचा डेटा खूप उत्साहवर्धक आहे. (हेही वाचा: भारतात कोरोना लसीकरणाने ओलांडला 153.70 कोटींचा टप्पा, आजच्या दिवसात 18 लाखांहून अधिक लसी दिल्या)

दरम्यान, देशात 10 जानेवारीपासून आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड-19 लसीचा अतिरिक्त डोस म्हणजेच बुस्टर डोस दिला जात आहे. यासाठी कोवॅक्सीनचा वापर केला जात आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यावर हा तिसरा डोस दिला जाईल.