कोरोना व्हायरस सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. तब्बल 181 देशातील नागरिक कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाने अनेकांचा बळी गेला आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी इटली, स्पेन, अमेरिका, भारत देशासह बहुतांश देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय सारं काही ठप्प आहे. मात्र या कठीण काळात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा देणारे कार्यरत आहेत. आपल्या सेवेसाठी तत्पर असलेल्या यांना गुगलने खास डुडल साकारत धन्यवाद दिले आहेत. 6 एप्रिल पासून गुगलने डुडलची एक खास सिरीज साकारली आहे. त्यात प्रत्येक दिवशी एका विशिष्ट यंत्रणेचे आभार मानण्यात आले आहेत. आज गुगलने साकारलेले डुडल हे खास ग्रोसरी वर्कर्स म्हणजे किराणा सामान पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या धन्यवाद देणारे आहे. (कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी 'घरी रहा सुरक्षित रहा' आवाहन करणारं खास गूगल डूडल)
आजच्या डूडलमध्ये Google च्या G आणि O मध्ये ग्रोसरी बास्केट दाखवण्यात आले आहे. तर E मधून त्यांनी ग्रोसरी वर्कर साकारला आहे. त्यामुळे लेटर E काही फळं आणि भाज्या विकताना दिसत आहे. तसंच या डूडल मध्ये लेटर E म्हणजेच ग्रोसरी वर्करकडे हार्ट फ्लो होताना दिसत आहे. याचाच अर्थ ग्रोसरी वर्कर म्हणजे किराणा कर्मचाऱ्यांविषयी आदर आणि आपुलकी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे वैद्यकीय यंत्रणांवरील ताण अधिक वाढला आहे. त्यामुळे डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपल्या जीवाची बाजी लावत समाजासाठी झटणाऱ्या या डॉक्टर्स सह सर्व वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार 7 एप्रिलच्या डुडलमधून मानण्यात आले होते. तर 6 एप्रिल रोजी कोरोना विषाणूवर लस, औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आभार मानण्यात आले होते. 8 एप्रिल रोजी अग्निशमन दल आणि पोलिस या दिवसरात्र काम करणाऱ्यांना धन्यवाद देणारे डूडल साकारण्यात आले होते. 9 एप्रिल रोजी सफाई कामगार तर 10 एप्रिल रोजी सर्व शेतकरी बांधवांचे खास डूडल साकारुन आभार मानण्यात आले होते. कोरोनाच्या संकटात सेवा पुरवणाऱ्यांसाठी साकारण्यात आलेले डूडल येथे पहा.
गुगल अनेक खास प्रसंगात, सण-समारंभ, थोरामोठ्यांची जयंती-पुण्यतिथी निमित्त डूडल साकारुन त्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत असतं. जागतिक आरोग्य संकटाच्या या कठीण काळातही समाजभान दाखवणारे हे डूडल नक्कीच खास आहे.