ताज महाल (फोटो सौजन्य- Pixabay)

आग्रा येथील ताजमहालमधील (Taj Mahal) 22 पैकी 20 बंद खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने फेटाळून लावली. याचबरोबर न्यायालयाने याप्रकरणी याचिकाकर्त्यालाही फटकारले. ताजमहालच्या 20 खोल्या उघडण्यासोबतच सर्वेक्षण करावयाची याचिका फेटाळल्याबद्दल याचिका दाखल करणारे भाजप नेते डॉ. रजनीश सिंह म्हणाले की, आम्ही हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात नेणार आहोत. न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने या याचिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 अन्वये न्यायालय असा आदेश देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले.

याचिकाकर्त्यांचे वकील रुद्र विक्रम सिंग यांनी कोणत्याही कायदेशीर तरतुदींशिवाय ही याचिका आकस्मिक पद्धतीने दाखल केल्याबद्दल खंडपीठाने ताशेरे ओढले. खंडपीठाने त्यांना असेही सांगितले की, याचिकाकर्ता त्याच्या कोणत्याही कायदेशीर किंवा घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे हे सांगू शकत नाही. युक्तिवादानंतर खंडपीठ याचिका फेटाळणार होते तेव्हा याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला याचिका मागे घेण्याची विनंती केली आणि योग्य कायदेशीर संशोधनासह दुसरी नवीन याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली, परंतु खंडपीठाने त्यांची विनंती मान्य केली नाही आणि याचिका फेटाळली.

ताजमहालच्या 20 खोल्या उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सांगितले की, तुम्ही समितीमार्फत वस्तुस्थितीचा शोध घेत आहात, तुम्ही कोण आहात? हा तुमचा अधिकार नाही आणि आरटीआय कायद्यानुसारही हा अधिकार नाही. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठातील न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘आमचे मत आहे की याचिकाकर्त्याने पूर्णपणे अन्यायकारक मुद्द्यावर निर्णय मागितला आहे. या याचिकांवर न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. (हेही वाचा: अमृतसरजवळील विहिरीत सापडले 282 भारतीय सैनिकांचे सांगाडे; 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात झाले होते शहीद)

दरम्यान, भाजपचे अयोध्या मीडिया प्रभारी डॉ. रजनीश सिंह यांनी 7 मे रोजी न्यायालयात याचिका दाखल करून ताजमहालच्या 22 पैकी 20 खोल्या उघडण्याची मागणी केली होती. या खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या बंद खोल्या उघडून त्यातील रहस्य जगासमोर उलगडले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्ते रजनीश सिंह यांनी राज्य सरकारकडे याप्रकरणी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून ताजमहालच्या खोल्यांच्या गुपितांबाबत देशात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दुसरीकडे ताजमहाल हा जागतिक वारसा असल्याने त्याला धार्मिक रंग देऊ नये, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.