
देशात गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना विषाणूचा (Coronavirus) धोका उद्भवला आहे. संपूर्ण देश या संकटाशी लढत असताना, स्वाइन फ्लू (Swine Flu) आजाराने आपले डोके वर काढले आहे. भारतामध्ये जुलै अखेर स्वाइन फ्लूच्या 2,721 घटना व 44 मृत्यूंची नोंद झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) च्या अधिकृत आकडेवारीनुसार, 31 जुलै पर्यंत कमीतकमी 2,721 एच 1 एन 1 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये कर्नाटक (458), तेलंगणा (443), दिल्ली (412), तामिळनाडू (253) आणि उत्तर प्रदेश (252) या ठिकाणी स्वाइन फ्लू आजाराची सर्वाधिक नोंद झाली आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की श्वसनासंबंधी या आजाराचा जन्म प्रथम डुकरांमध्ये झाला, परंतु आता खोकला आणि शिंका यांमुळे हा आजार मानवांमध्ये पसरत आहे. याची लक्षणे प्रमाणित हंगामी फ्लू सारखी आहे, ज्यामध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, वेदना आणि सर्दी यांचा समावेश आहे. या आजाराचा धोका सर्वात जास्त गर्भवती महिला, पाच वर्षाखालील मुले, वयोवृद्ध लोक आणि गंभीर वैद्यकीय परिस्थिती (पूर्व-अस्तित्वातील आजार) असलेल्या लोकांना आहे.
कोविड-19 आणि स्वाइन फ्लूची लक्षणे जवळजवळ एकसारखीच असल्याने लोकांनी अधिक सावध राहिले पाहिजे. कोविड-19 चाचण्या व्यतिरिक्त डॉक्टरांनी रुग्णाची तब्येत पाहून इन्फ्लूएंझा चाचण्या करणे गरजेचे आहे. तसेच, अधिक खबरदारी आणि सुरक्षिततेसाठी श्वसणाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी इन्फ्लूएंझाची लस घेण्याची ही योग्य वेळ आहे. फोर्टिस हॉस्पिटलमधील पल्मोनरी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. विकास मौर्य यांनी सांगितले की, हात स्वच्छता, दोन फुटांचे अंतर आणि फेस मास्क वापरणे हे गरजेचे आहे. (हेही वाचा: D614G: मलेशियामध्ये आढळला कोरोना विषाणूचा धोकादायक असा नवा स्ट्रेन; कोरोना पेक्षा 10 पट अधिक वेगाने पसरत आहे संसर्ग)
दरम्यान, मागील 24 तासात देशात 55,079 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले असुन, एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 27,02,743 वर पोहचली आहे. काल देशभरात एकुण 876 कोरोना रुग्णांचा मृत्यु झाल्याने सध्या देशातील कोरोनाच्या बळींची संख्या 51,797 इतकी झाली आहे.