सौम्य लक्षणे असणाऱ्या कोविड रूग्णांसाठी Steroids चा वापर काटेकोरपणे टाळावा- डॉ. रणदीप गुलेरिया
Dr Randeep Guleria, Director AIIMS (Photo Credits: ANI/Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) मागोमाग आता काळ्या बुरशीचा (Black Fungus) संसर्ग देशात पसरु लागला आहे. त्यामुळे रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे आणि नियमित तपासण्या सल्ला देण्यात येत आहे. मधुमेह असणे, स्टेरॉयडचा वापर आणि कोरोनाचा संसर्ग या सगळ्यामुळे म्युकरमायकोसीस (Mucormycosis) चा धोका अधिक वाढतो. त्यामुळे मधुमेहींना नियमित रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे आणि नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.

म्युकरमायकोसीस किंवा काळ्या बुरशीचा संसर्ग हा काही नवा आजार नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरु होण्यापूर्वी पासूनच हा आजार अस्तित्वात आहे. मात्र त्याचे प्रमाण फार कमी होते. परंतु, आता कोविड-19 मुळे दुर्मिळ आणि जिवघेण्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.  म्युकरमायकोसीस हा आजार कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या किंवा मुक्त होत असलेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे.

यावर AIIMS चे डिरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की,  म्युकरमायकोसीस हा आजार अधिकतर मधुमेह असलेल्यांना होत असल्याचे पाहायला मिळत आहे. केमोथेरपी घेत असलेल्या कर्करोगाच्या रूग्ण आणि इम्युनोसप्रप्रेसंट्स घेतलेले लोक यांना देखील या आजाराचा धोका असतो. परंतु, आता कोरोनाबाधित आणि त्यावरील उपचारपद्धतीनमुळे काळ्या बुरशीचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.

केळव AIIMS मध्ये काळ्या बुरशीच्या संसर्गाचे एकूण 20 पेक्षा अधिक रुग्ण आहेत आणि हे सर्व कोरोनाबाधित आहेत. अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसीसचे 400-500 रुग्ण सापडत आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले. (कोविड-19 लस मिळण्यासाठी सर्वसामान्यांना 2022 पर्यंत वाट पाहावी लागेल- AIIMS संचालक डॉ. रणदीप गुलेरिया)

त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्यांना काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच कोरोना व्हायरस संसर्गावर उपचार करताना रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य मंदावते त्यामुळे अशा रुग्णांनाही म्युकरमायकोसीसचा धोका बळावतो. त्यामुळे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्यांनी स्टिरॉइड्सचा वापर काटेकोरपणे टाळावा. स्टिरॉइड्समुळे म्युकरमायकोसीसचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

कोरोना बाधित व्यक्तीची ऑक्सिजन पातळी योग्य असल्यास त्यास सौम्य लक्षणे असतात. अशावेळी स्टिरॉइड्स पूर्णपणे टाळले गरजेचे आहे. जे स्टिरॉइड्स घेत आहेत त्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. कारण स्टिरॉइड्स घेतल्यानंतर मधुमेह नसताना देखील साखरेतील पातळी 300 ते 400 पर्यंत वाढलेली दिसते, असेही गुलेरिया यांनी सांगितले.

स्टिरॉइड्सचा उच्च डोस घेणे कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त नाही.  सौम्य ते मध्यम डोस घेणे पुरेसे आणि योग्य आहे. डेटानुसार, स्टिरॉइड्स फक्त पाच ते 10 दिवस दिले जावेत. कारण स्टिरॉइड्स रक्तातील साखरेची पातळी वाढवत असून नंतर त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. यामुळे बुरशीजन्य संसर्गाची शक्यता वाढू शकते, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.