COVID-19 Vaccine Update: कोविड-19 लस मिळण्यासाठी सर्वसामान्यांना 2022 पर्यंत वाट पाहावी लागेल- AIIMS संचालक डॉ. रणदीप गुलेरिया
Dr Randeep Guleria, Director AIIMS (Photo Credits: ANI/Twitter)

देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याने काहीसे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. मात्र एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Director Dr Randeep Guleria) यांनी दिलेल्या माहितीमुळे नागरिकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. CNN-Network 18 ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, "कोविड-19 ची लस सर्वसामान्यांसाठी पोहचण्यासाठी 2022 वर्ष उजाडेल. आपल्या देशाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे लस सर्वसामान्यांनापर्यंत पोहण्यासाठी वेळ लागेल. फ्लूच्या लसीप्रमाणे बाजारातून ही लस कशी विकत घेता येईल हे पाहण्याची गरज आहे आणि ती खरोखरच आदर्श परिस्थिती असेल."

त्याचबरोबर लस खरेदी प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील आव्हाने याबद्दलही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "लस कोणत्याही राष्ट्रवादाशिवाय सर्व देशांमध्ये उपलब्ध असावी. केवळ लस विकसित केलेल्या देशालाच लस उपलब्ध होऊ नये हे WHO ने अगदी योग्य सांगितले आहे. भारतात जेव्हा लस विकसित होईल. तेव्हा ती केवळ आजूबाजूच्या नाहीतर जगभरातील देशांमध्ये पोहचवली जाईल. इतर देशही असेच करतील अशी मला आशा आहे."

कोविड-19 च्या संभाव्य उपचारांबद्दल बोलताना ते म्हणाले, अजूनही मला असे वाटते, "यात प्लाझ्मा थेरपीची काही भूमिका आहे. आपण देत असलेल्या प्लाझ्माने neutralising antibodies तयार होणे आवश्यक आहे. प्लाझ्मा टेस्टिंगशिवाय प्लाझ्मा थेरपी देणे योग्य ठरणार नाही. कारण प्लाझ्मा मध्ये असलेल्या neutralising antibodies उपयुक्त आहेत की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. ही थेरपी सुरुवातीच्या टप्प्यात देणे अधिक फायदेशीर ठरले. 10 व्या किंवा 12 व्या दिवशी रुग्ण स्वतः अँटीबॉडीज तयार करत असल्याने नंतर त्याचा काही उपयोग होणार नाही." (COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Bharat Biotech च्या Covaxin ला Phase 3 मानवी चाचण्यांसाठी परवानगी; देशात 10 राज्यांत होणार ट्रायल्स)

प्राधान्यक्रमानुसार लसीचे योग्य वाटप करणे, हे भारतापुढील सर्वात मोठे आव्हान असल्याचे गुलेरिया यांनी सांगितले. इंजेक्शन्स, सिरींज, सुया इत्यादी आवश्यक सामानाचे देशातील दुर्गम भागात वितरण करणे मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे लसीची स्थान निश्चिती हे दुसरे मोठे आव्हान देशापुढे आहे. कारण नंतर विकसित झालेली पण अधिक प्रभावी असलेली लस याचे स्थान, वापर कसे ठरवणार हा ही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान,  आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 85,07,754 वर पोहचला असून त्यापैकी 78,68,969 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 5,12,665 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशात एकूण 1,26,121 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.