Steel Roads in India (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशातील विविध स्टील प्लांटमधून (Steel Plants) दरवर्षी दशलक्ष टन स्टीलचा कचरा निर्माण होतो. याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लागल्याने पोलादी कचऱ्याचा डोंगरासारखा ढीग अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता केंद्र सरकार या स्टीलच्या कचऱ्याचा वापर देशाच्या विकासकामांमध्ये करत आहे. प्रदीर्घ संशोधनानंतर गुजरातमध्ये देशातील पहिला स्टील रोड (Steel Road) बांधण्यात आला आहे. स्टीलच्या कचऱ्यापासून बनवलेला रस्ता 6 लेनचा आहे. माहितीनुसार, अभियंते आणि संशोधन पथकाने ट्रायलसाठी केवळ एक किलोमीटर लांबीचा असा 6 लेनचा रस्ता बनवला आहे,

यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये तयार होणारे महामार्गही स्टीलच्या कचऱ्यापासून बनवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टीलचे रस्ते बनवण्यासाठी, प्रदीर्घ प्रक्रियेनंतर स्टीलच्या कचऱ्यापासून माती बनवली गेली आणि नंतर ही माती रस्ते बनवण्यासाठी वापरली गेली. गुजरातमधील हजीरा बंदराजवळील सुमारे एक किलोमीटर लांबीचा रस्ता अवजड ट्रकच्या वाहतुकीमुळे पूर्णपणे खराब झाला होता. यानंतर प्रयोगाचा एक भाग म्हणून सरकारने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्टीलचा कचरा वापरला.

रस्ता तयार झाल्यानंतर आता दररोज 18 ते 30 टन वजनाचे 1000 हून अधिक ट्रक या रस्त्यावरून जात आहेत, मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही. या प्रयोगानंतर आता देशातील महामार्ग आणि इतर रस्ते स्टीलच्या कचऱ्यापासून बनवले जातील, कारण यापासून बनवलेले रस्ते अतिशय मजबूत आणि टिकाऊ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: दोन वर्षांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे रविवारपासून सुरू, येथे जाणून घ्या नवीन प्रवास मार्गदर्शक तत्त्वे)

हा पोलाद मंत्रालय आणि नीती आयोग यांच्या मदतीने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CRRI) द्वारे प्रायोजित प्रकल्प आहे. या प्रयोगामुळे महामार्ग आणि इतर रस्ते मजबूत होऊ शकतात आणि ते बनवण्याचा खर्चही सुमारे 30 टक्क्यांनी कमी होतो. दरम्यान, भारतातील स्टील प्लांट दरवर्षी 19 दशलक्ष टन स्टील कचरा निर्माण करतात आणि एका अंदाजानुसार, 2030 पर्यंत हा कचरा 50 दशलक्ष टन पर्यंत वाढू शकतो.