लॉक डाऊनमध्ये लोकांच्या बचतीमध्ये लक्षणीय वाढ; गेल्या 20 वर्षांतील सर्वात जास्त- Reports
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. या काळात आर्थिक व्यवहार थांबल्याने नागरिकांचे परिणामी देशाचेही मोठे नुकसान झाले. मात्र यामध्ये एक सकारात्मक बाब घडली ती म्हणजे, लोकांचे पैसे साठवून (Savings) ठेवण्याचे प्रमाण वाढले. लॉकडाऊन दरम्यान देशातील लोकांची बचत वाढली आहे. 2014 ते 2019 पर्यंत घरातील बचतीच्या दरात घट झाली होती, परंतु 2020 मध्ये त्यात अतिरिक्त 200 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 20 वर्षांमधील ही सर्वात जास्त आहे.

परदेशी ब्रोकर संस्था यूबीएस सिक्युरिटीज इंडिया लिमिटेडच्या मते, बरीचशी बचत रोखीत आहे. लॉकडाउन महिन्यात रोख बचतीच्या बाबतीत 135 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालानुसार, लॉकडाऊन दरम्यान लोकांनी कमी खर्च केला आणि बचत वाढवली. यामुळे, वित्तीय मालमत्तांमधील बचतीचा दर वाढला. जीडीपीच्या तुलनेत त्याचे प्रमाण 2008-09 च्या आर्थिक संकटाच्या आधीच्या पातळीवर पोहोचले आहे. (हेही वाचा: मार्चमध्ये चलनातून बाद होणार 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा? जाणून घ्या म्हणाले RBI)

अहवालानुसार, घरांमध्ये जमा झालेली बचतीचे ग्रॉस कॅपिटल फॉरमेशन म्हणजेच जीएसएफमध्ये 58 टक्के भागभांडवल आहे तर कॉर्पोरेटचा 32 टक्के हिस्सा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, घरगुती बचतीचा अर्थव्यवस्थेच्या एकूण भांडवलाच्या एक तृतीयांश भाग होता. शेअर बाजारात गुंतवणूक वाढली आहे परंतु ती एकूण बचतीच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे अहवालात म्हटले आहे. परंतु हे पाच टक्केदेखील मागील दोन वर्षांच्या एफपीआय गुंतवणूकीपेक्षा जास्त आहेत. 2020 मध्ये एफपीआयच्या गुंतवणूकीत 25 टक्के वाढ झाली आहे. अहवालात म्हटले आहे की एकूण बचतीच्या 14-14 टक्के रक्कम बँक ठेवी, विमा/बचतीत आहेत. 19 टक्के सरकारी बचत योजनांमध्ये 135 टक्के रोख रक्कम आहे.