मार्चमध्ये चलनातून बाद होणार 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा? जाणून घ्या म्हणाले RBI
Indian Currency | (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) सहायक महाव्यवस्थापक बी महेश यांनी शुक्रवारी सांगितले की, सेंट्रल बँक (Central Bank) मार्च, एप्रिलमध्ये 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून परत घेण्याचा विचार करीत आहे. जिल्हा पंचायतीच्या नेत्रावती हॉल येथे जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सुरक्षा समिती (DLSC) आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समिती (DLMC) च्या बैठकीमध्ये ते बोलत होते. महेश म्हणाले की, 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाहेर पडतील.

ते पुढे म्हणाले की, दहा रुपयांची नाणी चलनात येऊन 15 वर्षे झाले तरी अजूनही व्यापारी आणि व्यावसायिक ती नाणी स्वीकारण्यास तयार नाहीत. आता हीच नाणी बँका आणि आरबीआयसाठी समस्या बनल्या आहेत. बँकांकडे मोठ्या प्रमाणावर दहा रुपयांची नाणी जमा झाली आहे. त्यामुळे बँकांनी नाण्याच्या वैधतेबद्दल पसरल्या गेलेल्या अफवांविषयी लोकांना जागरूक केले पाहिजे. ही 10 रुपयांची नाणी पुन्हा चलनात येतील यासाठी बँकांनी काही मार्ग शोधले पाहिजेत.

2019 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने लॅव्हेंडर कलरमध्ये 100 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या, ज्यावर गुजरातमधील पाटणमधील सरस्वती नदीच्या काठावरील प्रसिद्ध स्टेपवॉल 'Rani ki vav; चे चित्र आहे. केंद्रीय बँकेने 100 रुपयांच्या नवीन नोटा देताना जाहीर केले होते की, यापूर्वी जारी केलेल्या 100 रुपयांच्या सर्व नोटांच्या कायदेशीर निविदादेखील कायम राहतील. (हेही वाचा: बॅंकेच्या लॉकर मध्येही पैसा सुरक्षित नाही; गुजरातच्या वडोदरा मधील Bank of Baroda मध्ये वाळवी लागल्याने व्यक्तीने गमावले 2.20 लाख रूपये!)

दरम्यान, 8 नोव्हेंबर, 2016 रोजी नोटबंदीनंतर केंद्रीय बँकेने 2000 रुपयांच्या नोटासह 200 रुपयांची नोटही चलनात आणली. 2019 मध्ये आरटीआयच्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले होते की, सेंट्रल बँकेने उच्च मूल्याच्या नोटांच्या छपाईला आळा घातला आहे. दुसरीकडे छोट्या नोटा (10 आणि 20) च्या वाढत्या संख्येमुळे बँक कर्मचारी आणि अधिकारी त्रस्त झाले आहेत. आरबीआय आणि ग्राहक या नोटा घेत नसल्यामुळे त्यांना बँकांमध्ये ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. परिस्थिती अशी आहे की या नोटा शेल्फमध्ये ठेवाव्या लागत आहेत. अशा जवळ जवळ 100 कोटीहून अधिक लहान नोट डंप पडल्या आहेत. अशीच परिस्थिती नाण्यांचीही आहे.