पै पै करून कमावलेला कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी अनेकांची खटपट सुरू असते. काही जण तो गुंतवतात तर काही जण तो सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरमध्ये ठेवतात. पण आता लॉकरही पैसे सुरक्षित ठेवण्याची जागा नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. दरम्यान वडोदरा (Vadodara) मध्ये बॅक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये एका व्यक्तीने 2 लाख रूपये बॅंकेच्या लॉकर मध्ये ठेवले होते पण ते वाळवीने (Termites) खाऊन टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, Rehna Qutubddin Desarwal या व्यक्तीने गुजरातच्या वडोदरा येथे बॅंक ऑफ बडोदा मध्ये सुमारे 2.20 लाख रक्कम लॉकरमध्ये ठेवली होती. प्रताप नगर भागात असलेल्या ब्रांचमध्ये लॉकर नंबर 252 मध्ये ही रक्कम नोटांच्या बंडल मध्ये होती. पण त्याला ही रक्कम वाळवीने खाल्ल्याचं दिसलं. हा प्रकार पाहून त्याच्याही पायाखालची क्षणभर जमीन सरकली होती.
Rehna Qutubddin Desarwal च्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बॅंक मॅनेजरकडे तक्रार केली, घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान त्याने बॅंकेकडे पैसे परत मिळावेत म्हणून मागणी केली आहे. आता बॅंक ऑफ बडोदा ब्रांच बद्दल अनेकांच्या मनात सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
सध्या अनेक लहान-मोठ्या बॅंका अचानक बुडत असल्याने नेमका पैसे कुठे ठेवावा म्हणजे तो सुरक्षित राहील? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. दरम्यान बॅंकेकडून मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर सिस्टिम दिली जाते. ही सेवा अनेक ठिकाणि सशुल्क आहे. पण अशाप्रकारे वाळवी लागून पैसा नष्ट होत असल्याच्या घटनेने अनेकजण खडबडून जागे झाले असतील. दरम्यान तुमची देखील अशीच मौल्यवान कागदपत्र, पैसे लॉकर मध्ये असतील तर ते नीट ठेवले आहेत की नाहीत? याची वरचेवर एकदा नीट तपासणी करा.