Shri Omkareshwar Jyotirlinga: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, भगवान ओंकारेश्वरच्या मंदिरातून दानपेटीची चोरी; SP ने ड्युटीवर तैनात सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले निलंबित 
Shri Omkareshwar Jyotirlinga (संग्रहित संपादित प्रतिमा)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकार वेळोवेळी सुरक्षेचे दावे करत असूनही इथे गुन्हेगारीच्या घटना थांबत नाहीत. बलात्कार, दरोडा, विषारी दारू, चोरी आणि फसवणूक अशा घटना इथे सामान्य झाल्या आहेत. सामान्य लोकांचेच काय पण मध्य प्रदेशातील चोरांनी देवाचे घरही सोडले नाही. देशातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिराची (Shri Omkareshwar Jyotirlinga) दान पेटीही चोरट्यांनी पळवली आहे. होय, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, भगवान ओंकारेश्वरच्या मंदिरातून दानपेटी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने मंदिराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रंदिवस मंदिर परिसरातील सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. तसेच इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. असे असूनही, चोर दानपेटीसह पळून जाण्यात यशस्वी झाले.

ओंकारेश्वर मंदिरात गर्भगृहासमोर पंचमुखी गणेश मंदिराजवळ दान पेटी ठेवण्यात आली होती. रविवारी-सोमवारी मध्यरात्री रात्री अडीच वाजताच्या सुमारास ती पळवून नेली. लोक जेव्हा मंदिरात पोहोचले तेव्हा दानपेटी गायब होती. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी, विश्वस्त अधिकारी आणि मांधाता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दानपेटी कोटीतीर्थ घाटाला जोडणार्‍या नवीन पुलावर सापडली. पोलिसांनी तपासणी केली असता, दानपेटीचे कुलूप तोडण्यात आले असल्याचे आढळले तसेच आतली चिल्लर आजूबाजूला विखुरली होती. (हेही वाचा: आता गोमुत्रापासून बनलेल्या फिनाईलचा वापर करून स्वच्छ होणार सरकारी कार्यालये; आदेश जारी)

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची छाननी करण्यात आली आहे. फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य पाहता खंडवा एसपी विवेक सिंग यांनी त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या सर्व 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. महाकाल मंदिर परिसरात गेल्या काही काळात खून, चोरी, लूटमार आणि दगडफेक या घटना वाढल्या आहेत. त्याचा थेट भाविकांवर परिणाम होतो. मंदिराच्या सभोवताल सुरक्षित वातावरण असले पाहिजे. त्यामुळे येथील नेते व अधिकाऱ्यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे.

दरम्यान, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग संकुल ही पाच मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर भगवान महाकालेश्वरचे मंदिर आहे, तिसर्‍या मजल्यावर सिद्धनाथ महादेव आहे, चौथ्या मजल्यावर गुप्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि पाचव्या मजल्यावर राजेश्वर महादेवाचे मंदिर आहे. नर्मदेच्या दक्षिणेकडील आणि उत्तरी किनारपट्टीवर ओंकारेश्वरमध्ये बरीच मंदिरे आहेत.