
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) या अभियानांतर्गत अनेक गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून न राहता, भारत आता स्वतःच सर्जनशील बाबींची निर्मिती करत आहे. याआधी शेणापासून तयार केलेला पेंट बाजारात आला होता आता गोमुत्रापासून (Cow Urine) फिनाईल (Phenyl) बनवले जात आहे. हे फिनाईल सरकारी कार्यालये स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणार आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सरकारी कार्यालयांमध्ये आता नामांकित कंपन्यांऐवजी गो-फिनाईलचा वापर केला जाईल. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत विभाग प्रमुखांना आदेश जारी केले आहेत. या आदेशात, पंचायतांपासून मंत्रालय पातळीपर्यंतच्या सरकारी कार्यालयांमध्ये गो-फिनाईलचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. शिवराज सरकारच्या या निर्णयाला गोवर्धन आणि गोरक्षणाच्या क्षेत्रातले मोठे पाऊल मानले जात आहे.
भारतीय संस्कृतीत गायीला आईचे स्थान प्राप्त झाले आहे. सनातन धर्मात गायीचे शेणही शुद्ध मानले जाते. गोमूत्र अनेक रोग बरे करते. आता पालिकेने नवादा रोडवरील गोशाला येथे गोमूत्रातून अर्क काढण्याचे व फिनाईल बनविण्याचा पायलट प्रकल्प सुरू केला आहे. इथल्या यशस्वी प्रयोगानंतर आत्मनिर्भर गौशाला योजनेंतर्गत शहरातील इतर गोशाळांमध्ये याची सुरूवात होईल. राज्यातील गायींचे संरक्षण आणि संवर्धनासाठी नोव्हेंबरमध्ये झालेल्या पहिल्या गाय मंत्रिमंडळात गो फिनाईल वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन विभागाचे मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी पूर्वी सांगितले होते की, 'गोमूत्र बॉटलिंग प्लांटला चालना देणे आणि गोमूत्र कारखाने स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’
मात्र या आदेशानंतर राज्यात राजकारण सुरू झाले आहे. कॉंग्रेसचा आरोप आहे की शिवराज सरकार गो-फिनाईलच्या नावाखाली एका खासगी कंपनीला फायदा देऊ इच्छित आहे. कॉंग्रेसचे आमदार कुणाल चौधरी म्हणाले की, पतंजलीच्या फायद्यासाठी सरकारने हा आदेश काढला आहे. शिवराज सरकार गो-फिनाईलच्या धर्तीवर बराच भ्रष्टाचार करणार आहे. (हेही वाचा: खादी इंडियाने सादर केले गायीच्या शेणापासून बनवलेले पेंट; मिळणार आठ फायदे)
दरम्यान, गोमूत्र एक प्रभावी जंतुनाशक मानला जातो. काही ठिकाणी गोमुत्रापासून फिनाईल बनवण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. गोमूत्रमध्ये पाइन तेल, पाणी, सिट्रोनेला आणि कृत्रिम सुगंधित पदार्थ मिसळून हे फिनाइल तयार केले जाते. 100 लिटर फिनाईल तयार करण्यासाठी सुमारे 70 लिटर मूत्र वापरले जाते. गोमूत्रापासून एक लिटर फिनाईल बनवण्यासाठी 25 रुपये खर्च येतो. बाजारात त्याची किंमत 30 रुपये प्रति लीटर आहे. पतंजली गोमुत्रापासून तयार केलेले फिनाईल विकत आहे.