Santhan Passes Away: राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी संथन याचा मृत्यू; फाशीची शिक्षा बदलल्यावर भोगत होता जन्मठेपेची शिक्षा
Rajiv Gandhi assassination Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हत्या (Rajiv Gandhi Assassination Case) प्रकरणात दोषी आढळलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सात दोषींपैकी एक असलेल्या संथन (Santhan ) याचे निधन झाले. तो 55 वर्षांचा होता. चेन्नई येथील राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात (Rajiv Gandhi Government General Hospital in Chennai) आज (28 फेब्रुवारी) त्याचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

यकृत निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल

राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी संथन हा पाठीमागील अनेक काळापासून प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होता. जानेवारी महिन्यात त्याला यकृत निकामी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान केलेल्या वैद्यकीय तपासणी त्याला क्रिप्टोजेनिक सिरोसिसचे निदान झाले होते. तसेच, त्याच्या यकृताची स्थिती अतिशय बिनकामाची होती. (हेही वाचा, Rahul Gandhi On Rajiv Gandhi: 'पापा, आप मेरे साथ ही हैं', राजीव गांधी यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; सोशल मीडियावर शेअर केला Video)

वैद्यकीय उपचार सुरु असतानाच हृदयविकाराचा झटका

त्याच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयातील डीन डॉ. ई. थेरनीराजन यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की, रुग्णालयात दाखल केल्यापासूनच त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. रुग्णालयात असतानाच बुधवारी त्याला हृदयविकाराचा झटका आला. तातडीने केलेल्या वैद्यकीय उपचारात त्याची प्रकती सुधारली. मात्र, त्यानंतर सकाळी साडेसात वाजता त्याचे निधन झाले. (हेही वाचा, Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या सुटकेला काँग्रेसचा आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार पुनर्विचार याचिका)

फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हत्या प्रकरणात संथन याचा सहभाग होता. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र, नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली. आयुष्यातील 32 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये इतर पाच दोषींसह त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्याला इतर दोषींसह त्रिची मध्यवर्ती कारागृह कॅम्पसमध्ये एका विशेष शिबिरात ठेवण्यात आले कारण ते श्रीलंकेचे नागरिक होते परंतु त्यांच्याकडे पासपोर्ट किंवा प्रवासी कागदपत्रे नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने मे 2022 मध्ये मुदतपूर्व सुटका मंजूर केलेल्यांमध्ये समावेश असलेल्या दोषींची सहा दोषींमध्ये नलिनी, रविचंद्रन, एस. जयकुमार, संथन, मुरुगन आणि बी. रॉबर्ट पायस यांचा समावेश होता.

एक्स पोस्ट

दरम्यान, विदेशात आश्रय मागणाऱ्या इतर कैद्यांप्रमाणे संथन यानेही मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने याचिकेद्वारे म्हटले होते की, श्रीलंकेत असलेल्या त्याच्या वृद्ध आईची पुन्हा भेट व्हावी. यासाठी त्याला मान्यता मिळावी. तिरुची मध्यवर्ती कारागृहातील एका विशेष शिबिरात ठेवण्यात आलेल्या संथनला हद्दपारीसाठी अधिकाऱ्यांसमवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात येणार होते. संथनच्या विनंतीनंतर, श्रीलंकेच्या उपउच्चायुक्ताने पूर्वी एक तात्पुरता प्रवास दस्तऐवज जारी केला होता आणि नंतर FRRO ने त्याच्या निर्गमनासाठी एक्झिट परमिट मंजूर केले होते.