Salary Hike In 2025: खाजगी क्षेत्रात (Private Sector) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे, पुढील वर्षी 9.5% पर्यंत पगार वाढू (Salary Hike) शकतो, जो 2024 मध्ये 9.3 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही माहिती जागतिक व्यावसायिक सेवा फर्म एऑनने (Aon) प्रदान केली आहे. पीएलसीच्या 30 व्या वार्षिक वेतनवाढ आणि व्यवसाय सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये 40 उद्योगांमधील 1,176 कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण करून हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये अभियांत्रिकी, उत्पादन आणि किरकोळ उद्योगांमधील पगारात 10 टक्के आणि वित्तीय संस्थांमधील पगारात 9.9 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.
सर्वेक्षण अहवालानुसार, 2025 मध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात सरासरी 9.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. पुढील वर्षी उत्पादन आणि रिटेलमध्ये 10 टक्के आणि वित्तीय कंपन्यांमध्ये 9.9 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर आणि टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स आणि प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 9.9 टक्के आणि 9.3 टक्के पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय तंत्रज्ञान समुपदेशन आणि सेवा क्षेत्रातील वेतन 8.1 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
या अहवालानुसार, 2022 मध्ये ॲट्रिशन रेट हा 21.4 टक्के, 2023 मध्ये 18.7 टक्के होता आणि आता 2024 मध्ये तो 16.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. या अभ्यासाचा दुसरा टप्पा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये गोळा केलेल्या डेटासह 2025 च्या सुरुवातीला प्रकाशित केला जाईल. भारतातील पगारवाढीचे कारण म्हणजे भरभराट होत असलेली अर्थव्यवस्था, हे आहे. एऑनचे भागीदार रुपंक चौधरी म्हणाले की, हा अहवाल दाखवतो की भारतातील व्यवसायाचे भविष्य चांगले आहे. (हेही वाचा: Tech Layoffs 2024: टेक इंडस्ट्री नोकरकपात सुरूच; 2024 मध्ये 451 कंपन्यांनी सुमारे 1,39,206 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले- Report)
ॲट्रिशन रेटमधील या घसरणीमुळे कंपन्यांना अंतर्गत विकास आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीवर लक्ष केंद्रित करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे एऑन तज्ज्ञांचे मत आहे. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा अंतर्गत विकास करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून नवीन नियुक्त्यांवर होणारा खर्च कमी करता येईल. यामुळे दीर्घकालीन उत्पादकता देखील सुधारेल. सर्वेक्षणानुसार, स्पर्धात्मक जॉब मार्केटमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांनी वेगाने बदलणाऱ्या पगाराचा ट्रेंड आणि मार्केट डेटावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.