Mohan Bhagwat | (Photo Credits: ANI)

सीएए कायदा (CAA) देशातील कोणत्याही नागरिकाच्या विरोधात नाही. सीएए कायद्याचा देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही. त्यामुळे कोणालाही घाबरुन जाण्याचे कारण नाही. परंतू, वेगवेळ्या विचारांचे लोक असतात. ते सर्व समाजात असतात. त्यामुळे सांप्रदायिक विचारांतून त्याचा विरोध करण्यात येत होता. परंतू, यावर अधिक चर्चा होण्यापूर्वी, यावर्षी कोरोनावर लक्ष केंद्रित केले गेले. कोरोना संकटामुळे हे सर्व विषय दबले गेले, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव (RSS Vijayadashami Celebration) नागपूर (Nagpur) येथे संघ मुख्यालयात पार पडला. या वेळी ते बोलत होते. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले. राम मंदिराचा निर्णय देशातील जनतेने संयमाने स्वीकारला, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

या वेळी बोलताना संरसंघचालक म्हणाले, जगातील अनेक देशांच्या तुलनेत भारताने कोरोना व्हायरस संकट कुशलतेने हाताळले आहे. भारत या संकटात इतर देशांच्या तुलनेत अधिक भक्कमपणे उभा राहिला आहे. त्यामुळे इतर देशांपेक्षा कोरोना व्हायरस संकट भारतामध्ये कमी प्रमाणावर पाहायला मिळते, असेही सरसंघचालक म्हणाले.

कोरोना व्हायरस संकटाच्या काळात घेण्यात आलल्या लॉकडाऊन मुळे अनेक लोक आपला व्यवसाय, नोकरी सोडून आपापल्या मूळ गावी गेले. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसाय संपुष्टात आले. हे लोक हळूहळू परत येऊ लागले आहेत. परंतू, असे असले तरी परत आलेल्यांना रोजगार असतीलच असे नाही. त्यामुळे अशा लोकांना प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यांना नव्याने रोजगार शोधावा लागेल, असे आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, राहुल गांधींचा आरोप- भारतात Facebook, WhatsApp वर भाजपा-आरएसएसचे नियंत्रण आहे, पसरवतात खोट्या बातम्या आणि तिरस्कार)

मोहन भागवत यांनी पुढे बोलता सांगितले, सीएए कायदा देशातील कोणत्याही नागरिकाच्या विरोधात नाही. सीएए कायद्याचा देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही. त्यामुळे कोणालाही घाबरुन जाण्याचे कारण नाही. परंतू, वेगळ्या विचारांचे लोक असतात. ते सर्व समाजात असतात. त्यामुळे सांप्रदायिक विचारांतून त्याचा विरोध करण्यात येत होता. कोरोना संकटामुळे हे सर्व विषय दबले गेले.

पुढे बोलताना सरसंघचालक भागवत म्हणाले, आपण समरसता, करुणा, आणि शांतपणे संकटाच्या काळात एकमेकांना सहकार्य करायला हवे. त्यातही कोरोना व्हायरस संकटाच्या काळात अधिक प्रेमाने एकत्र यायला हवे.