Republic Day 2019: 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जाईल. या दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांची जोरदार तयारी सुरु आहे. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त 90 मिनिटांची परेड असेल. परेडचे मुख्य आकर्षक 58 जनजातीय अतिथी, वेगवेगळी राज्ये आणि केंद्र सरकारच्या विभागांचे 22 चित्ररथ असतील.
गणतंत्र दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा (South African President Cyril Ramaphosa) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या दिवसाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेट वरील अमर जवान ज्योतीवर शहीदांना पुष्पचक्र अर्पण करुन करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथांसोबतच सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि विकासावर आधारीत केंद्र सरकारच्या विभागातील चित्ररथ परेडमध्ये सहभागी होतील. सांस्कृतिक विषयांवरील चित्ररथासोबत काही लोकनृत्य देखील सादर होतील. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कार विजेते 26 मुले खुल्या जीपमधून बसून चित्ररथात सहभाग घेतील. (यावर्षी राजपथावर महाराष्ट्र साकारणार 'छोडो भारत' चळवळीचा देखावा)
महात्मा गांधींच्या समाधीला सुरक्षा देणारे केंद्रीय अर्ध सैनिक बल सीआयएसएफच्या चित्ररथाला यंदा 11 वर्षांनंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सहभाग घेणार आहेत. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपती सिरिल रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. रामाफोसा यांच्या सोबत त्यांची पत्नी डॉ. शेपो मोसेपे उपस्थित असतील. यांच्यासह नऊ मंत्र्यांसह उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ, वरिष्ठ अधिकारी आणि 50 सदस्यांचे व्यावसायिक प्रतिनिधीमंडळ देखील असेल. नेल्सन मंडेलानंतर हे दक्षिण आफ्रिकेचे दुसरे राष्ट्रपती असतील जे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. (प्रजासत्ताक दिनाचे मोदी सरकारचे आमंत्रण डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले)
का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन?
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र मिळाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक झाला आणि देशात संविधान लागू झाले. यानिमित्ताने 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. पीआयबी नुसार, देश 26 जानेवारी 1950 ला सकाळी 10:18 वाजता भारत प्रजासत्ताक देश झाला.
त्यानंतर सहाच मिनिटात 10:24 मिनिटांनी राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या दिवशी पहिल्यांदा राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद बग्गीत बसून राष्ट्रपती भवनाच्या दिशेने गेले आणि पहिल्यांदा भारतीय सैन्य दलाने त्यांना सलामी दिली. तेव्हा पहिल्यांदा त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आले होते.