महाराष्ट्राचा चित्ररथ (संग्रहित संपादित प्रतिमा)

26 जानेवारीला भारतात सर्वत्र भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होईल. यंदाचा हा 70 वा प्रजासत्ताक दिन असणार आहे. याचे औचित्य साधून राजधानी दिल्लीच्या राजपथावर संचालनाचे आयोजित करण्यात येते. दरवर्षी विविध राज्याचे चित्ररथ या संचलनामध्ये सहभागी होतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यंदा प्रजासत्ताक दिनाला राजपथवर महाराष्ट्राचा चित्ररथ 'छोडो भारत' चळवळीवर (Quit India Movement)आधारीत असणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हा चित्ररथ साकारणार असून, तब्बल 150 पुतळे या चित्ररथावर असणार आहेत. स्वदेशी गोष्टींचे प्रतीक असणारा चरखा आणि मुंबईची खास ओळख ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या मोठ्या प्रतिमाही चित्ररथावर असणार आहेत.

1942 साली महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘छोडो भारत’ असा इशारा दिला, त्यानंतरच संपूर्ण भारत स्वातंत्र्य मिळवण्याच्या इच्छेने प्रेरित झाला. हाच देखावा महाराष्ट्राच्या वतीने राजपथावर सादर होणार आहे. देशभरातून 29 राज्यांनी राजपथावरील प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 15 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे.

दरवर्षी राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुणे यांच्यास मान्यवरांच्या उपस्थितीत भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राने शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता, त्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ येताच जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी राजपथाचा परिसर दुमदुमून गेला होता.