सध्या संपूर्ण जगावर मंदीचे सावट पसरले आहे. सर्वाधिक चर्चा अमेरिकेच्या संभाव्य मंदीची होत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा भारतावर लक्षणीय परिणाम होत असल्याने भारत आणि भारतीय कंपन्याही भीतीच्या छायेखाली आहेत. अशात भारतातील पगारवाढीच्या आकड्यांबाबत एक नवीन अहवाल समोर आला आहे. बिझनेस स्टँडर्डने आयएएनएस या वृत्तसंस्थेचा हवाला देत म्हटले आहे की, 2023 मध्ये भारतात सरासरी पगारवाढ 10.4 टक्के असेल
या वर्षी (2022 मध्ये) आतापर्यंत सरासरी 10.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक व्यावसायिक सेवा फर्म Aon ने सोमवारी हा अहवाल प्रसिद्ध केला. 2022 च्या पहिल्या सहामाहीत नोकरी गमावण्याचे प्रमाण 20.3 टक्क्यांच्या उच्च पातळीवर राहिले, जे 2021 मध्ये नोंदवलेल्या 21 टक्क्यांपेक्षा थोडेसे कमी आहे. त्यामुळे वेतनावरील ताण कायम आहे. येत्या काही महिन्यांत हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतातील ह्युमन कॅपिटल सोल्युशन्सचे भागीदार रुपंक चौधरी म्हणाले की, जागतिक मंदी आणि देशांतर्गत चलनवाढीतील अस्थिरता असूनही अपेक्षित पगारवाढीचा दर दुहेरी अंकात असणार आहे. या अहवालानुसार, ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक पगार 12.8 टक्के दराने वाढेल, त्यानंतर स्टार्टअप्समध्ये 12.7 टक्के दराने वाढ होईल. हायटेक, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान-सक्षम सेवा क्षेत्रातील पगार 11.3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, वित्तीय संस्थामधील वेतन 10.7 टक्के दराने वाढेल. (हेही वाचा: 5G Services in India: देशात 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार 5G सेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन)
या संशोधनात देशातील 40 उद्योगांमधील 1300 कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. भारतातील Aon चे ह्युमन कॅपिटल सोल्युशन्सचे संचालक जंग बहादुर सिंह म्हणाले, मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थितीचा टॅलेंट लँडस्केपवर परिणाम होत असल्याने, व्यवसायांनी रणनीती आखली पाहिजे, जेणेकरून चांगले आणि योग्य कर्मचारी त्यांच्यासोबत राहतील.