Reliance-Facebook Deal: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यातील व्यवहाराचे इंगित काय?
Reliance-Facebook Deal | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुकेश आंबानी यांच्या (Mukesh Ambani) नेतृत्वाखालील रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीसोबत मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या फेसबुक (Facebook) या कंपनीने भागिदारी केली. ही भागीदारी केवळ 10% इतकीच असली तरी त्यासाठी मोजण्यात आलेली रक्कम छोटी नाही. त्यामुळे या व्यवहारामागचे इंगित काय? असा सवाल अनेक स्थरावरुन विचारला जातो आहे. हा व्यवहार करणे नक्कीच एका रात्री किंवा घाईगडबडीत ठरले नसणार. आपापल्या देशात आपापल्या क्षेत्रात अव्वल ठरलेल्या या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या हा योगायोग नक्कीच नाही. त्यामुळे ही भागीदारी करताना रिलायन्स जिओ कंपनीने नेमका काय विचार केला असावा याबाबत देशातील आर्थिक, औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक चर्चा सुरु आहेत.

देशातील दिग्गज कंपन्यांना रिलायन्स जिओने टाकले मागे

क्षेत्रं वेगवेगळी असली तरी आर्थिक स्तरावर रिलायन्स जिओ, इन्फोसिस, एचडीएफसी, एफएमसीजी आदी कंपन्यां एकमेकांच्या स्पर्धक कंपन्या. त्यामुळे आपापली बलस्थानं उंचवात आपला विस्तार वाढविण्यावर या कंपन्यांचा नेहमीच भर राहिला आहे. मूल्यनिर्धारण (Valuation) तुलनेत रिलायन्स जिओ ही कंपनी एचडीएफसी, इन्फोसिस, एफएमसीजी अशा कंपन्यांच्या केव्हाच पुढे गेली आहे. रिलान्स आणि फेसबुक यांच्या झालेला व्यवहार मंगळवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे रिलायन्स जिओ कंपनीचे मूल्यनिर्धारण (Valuation) 43,574 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे 4.4 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले.

फेसबुकडून भरभक्कम रक्कम

कंपनीचे हे मूल्यनिर्धारण दिग्गज कंपन्यांसोबतच देशातील सर्वात मोठ्या एसबीआय (SBI) बँकेपेक्षाही अधिक आहे. सोशल मीडिया कंपनीने जिओ कंपनीत 9.9% भागिदारी केली. ही भागिदारी खरेदी करण्यासाठी फेसबुकने बलदंड रक्कम आदा केली. ज्यामुळे रिलायन्स जिओ कंपनीचे मूल्यनिर्धारण 4,40,141 कोटी रुपये इतके झाले आहे. रिलायन्स जिओची सहचारी भगिनी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 52% च्या बरोबरीत आहे. (हेही वाचा, Reliance-Facebook Deal: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्सने फेसबुक आणि विविध कंपन्यांसोबत आतापर्यंत केलेले महत्त्वाचे व्यवहार)

देशातील सर्वात मोठी 5 वी कंपनी

बीएसई सेन्सेक्समध्ये रिलायन्स जिओ मार्केट भांडवल बाजाराचा विचार करता देशातील सर्वात मोठी 5 वी कंपनी ठरली आहे. उद्योगविश्व आणि भांडवली बाजाराचे अभ्यासक सांगतात की जिओचे मूल्यनिर्धारण इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास फेसबुकची गुंतवणूक कारणीभूत आहे. त्यामुळे या व्यवहारामुळे फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांना या व्यवहारामागे नेमकी रणनिती काय आहे? याबाबत उत्सुकता आहे.

नेमकी रणनिती काय?

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओचा विचार करता फेसबुकसोबत व्यवहार करुन कंपनीवर असलेले कर्ज चुकते करणे असा विचार कंपनीचा असू शकतो. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रणनिती अशी दिसते आहे की, येत्या काळात रिलायन्स समूहावर असलेला कर्जाचा डोंगर लवकरात लवकर संपुष्टात आणणे. दरम्यान, कोरोना संकटामुळे क्रुड ऑइल दर कमालिचे घसरले आहेत. त्यामुळे सौदी अरबमधील दिग्गज तेल कंपनी अरामकोने रिलायन्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव स्थगित केला आहे. त्यामुळे रिलायन्स जिओला फेसबुक कंपनीसोबत फायदेशीर ठरणारे होते.

फेसबुक

अभ्यासक सांगतात की, फेसबुक कंपनी आपली मालकी असलेले व्हॉट्सअॅप सेवा अधिक विस्तारण्याचा विचार करते आहे. त्यामुळे गेली तिन वर्षे फेसबुक व्हॉट्सअॅप पे सर्विस लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, केंद्र सरकार त्याला मान्यता देत नाही. त्यामुळे भारतीय बाजारात आपले बस्तान बसवले तर आपला मूळ उद्देश सफल होईल असा विश्वास फेसबुकला वाटत असावा.