RBI Logo (File Photo/ANI)

भारताच्या रिझर्व्ह बँकेने (RBI) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मे 2025 मध्ये,देशातील अनुसूचित व्यावसायिक बँकांकडील कर्ज व ठेवीवरील व्याजदरांमध्ये घट झाली आहे. फेब्रुवारी 2025 पासून RBI ने केलेल्या एकूण 100 बेसिस पॉइंट रेपो दर कपातीनंतर हा बदल झाल्याचे दिसून येत आहे. नवीन रुपी कर्जांवरील वेटेड अवरेज लेंडिंग रेट (WALR) मे 2025 मध्ये घसरून 9.20% वर आला आहे, जो एप्रिलमध्ये 9.26% होता. तसेच, चालू कर्जांवरील WALR देखील थोडासा कमी होऊन मे मध्ये 9.69% वर आला, जो एप्रिलमध्ये 9.70% होता.

अनुसूचित बँकांच्या 1-वर्षीय माध्यमिक मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स आधारित कर्ज दर (MCLR) जूनमध्ये 8.90% पर्यंत खाली आला, जो मेमध्ये 8.95% होता. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, एकूण फ्लोटिंग रेट कर्जांपैकी External Benchmark आधारित Lending Rate (EBLR) याचे प्रमाण मार्च 2025 अखेरीस 61.6% इतके झाले आहे, जे डिसेंबर 2024 मध्ये 60.6% होते. MCLR आधारित कर्जांचे प्रमाण मात्र कमी होऊन 34.9% झाले, जे डिसेंबर 2024 मध्ये 35.9% होते.

दुसरीकडे, नवीन रुपी मुदत ठेवींवरील वेटेड अवरेज डोमेस्टिक टर्म डिपॉझिट रेट (WADTDR) मे 2025 मध्ये 6.11% इतका होता, जो एप्रिलमध्ये 6.34% होता. चालू मुदत ठेवींवरील WADTDR देखील कमी होऊन मेमध्ये 7.07% झाला, जो एप्रिलमध्ये 7.10% होता. देशातील अनेक बँकांनी आपले कर्जाचे दर कमी करत RBI च्या पतधोरण समितीने केलेल्या 100 बेसिस पॉइंट रेपो दर कपातेचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

या घडामोडींचा उद्देश देशातील कर्ज घेण्याची क्षमता वाढवणे आणि आर्थिक गतीला चालना देणे हा आहे. कर्जदरांमधील घसरणीमुळे सामान्य ग्राहक आणि उद्योगांसाठी कर्ज घेणे अधिक सुलभ होणार आहे. फेब्रुवारी 2025 पासून एकूण 100 बेसिस पॉइंट रेपो दर कपातीनंतर, अधिक कपात होण्याची शक्यता मर्यादित असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अलीकडील पतधोरण बैठकीनंतर सूचित केले. ही धोरणात्मक पावले आर्थिक वाढीला गती देण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा संतुलित दृष्टिकोन दर्शवतात. येत्या तिमाहीत गुंतवणूक आणि खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे.