
प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) याने 'इंडियाज गॉट लेटेंट' या वेब शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशभरात त्याच्याविरुद्ध टीका होत आहे. विविध राज्यांमध्ये त्याच्या विरोधात अनेक एफआयआर दाखल झाल्या आहेत. आता या एफआयआर रद्द करण्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात त्याचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील अभिनव चंद्रचूड (Abhinav Chandrachud) करत आहेत. अभिनव हे माजी मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. या प्रकरणात रणवीरसह 'इंडियाज गॉट लेटेंट' शोशी संबंधित इतर व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणीस नकार-
आसाम पोलिसांनी रणवीरला चौकशीसाठी समन्स जारी केले होते. त्यामुळे अभिनव चंद्रचूड यांनी मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी तातडीने सुनावणीची विनंती केली. मात्र, मुख्य न्यायाधीशांनी तातडीच्या सुनावणीसाठी तोंडी विनंत्या स्वीकारल्या नाहीत, परंतु प्रकरण दोन-तीन दिवसांत सुनावणीसाठी येईल असे आश्वासन दिले. दुसरीकडे, अभिनव यांनी गेल्या आठ वर्षे आणि सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात कोणताही खटला लढला नव्हता. पण आता रणवीर क्रकारणात त्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारतातील न्यायिक वर्तुळात चंद्रचूड कुटुंबाचे नाव खूप आदराने घेतले जाते. अभिनव यांचे वडील डी. वाय. चंद्रचूड हे मे 2016 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आणि नंतर ते भारताचे मुख्य न्यायाधीश बनले. डी. वाय. चंद्रचूड न्यायव्यवस्थेत इतक्या उच्च पदावर असूनही, अभिनव यांनी त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळात कधीही सर्वोच्च न्यायालयात खटला सादर केला नव्हता.
जाणून घ्या कोण आहेत अभिनव चंद्रचूड-
अभिनव चंद्रचूड हे मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे प्रतिष्ठित वकील आहेत. त्यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून 2008 साली एलएल.बी. पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर, त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएल.एम. (2009) आणि स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून जे.एस.एम. (2012) आणि जे.एस.डी. (डॉक्टर ऑफ सायन्स ऑफ लॉ) पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांमध्ये 'रिपब्लिक ऑफ रेटोरिक: फ्री स्पीच अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया' आणि 'दीज सीट्स आर रिजर्व्ड: कास्ट, कोटाज अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया' यांचा समावेश आहे. (हेही वाचा: SC On Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादिया सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका; लवकर सुनावणी करण्यास न्यायालयाने दिला नकार)
त्यांनी याआधी परदेशात गिब्सन, डॉन अँड क्रचर या आंतरराष्ट्रीय कायदा फर्ममध्ये सहयोगी वकील म्हणून काम केले. नंतर ते भारतात परतले आणि त्यांनी इथे कायद्याचा सराव करण्यास सुरुवात केली. माजी सरन्यायाधीशांनी त्यांच्या निरोप भाषणात खुलासा केला होता की, त्यांच्या मुलांनी (अभिनव आणि चिंतन) सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यास नकार दिला होता. त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितले होते की, त्यांच्या निवृत्तीनंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करू.