
जगभरातील कोट्यावधी भक्त अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Temple) उभारण्याची वाट पाहत आहेत. हे राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. अशात आता श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर केली आहे. पुढील वर्षी 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होतील. याशिवाय रामनवमीला भगवान रामाच्या सूर्य तिलकची तयारीही पूर्ण झाली आहे. याआधी 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
उत्तर प्रदेश सराफा मंडळ असोसिएशनचे प्रांतीय अधिवेशन श्री रामाची नगरी अयोध्येत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, गर्भगृहात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात अनेक तारखांवर चर्चा झाली. यानंतर 22 जानेवारी 2024 रोजी हा विधी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख समोर आल्यानंतर आता सप्टेंबरपर्यंत गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही चंपत राय यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर रामलल्लाच्या मूर्तीचे बांधकाम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. रामलल्लाची मूर्ती अयोध्येतच तयार केली जाईल, असेही राय यांनी म्हटले आहे. कर्नाटकातून आणलेली ‘कृष्ण शिला’ कोरून रामलल्लाची ही मूर्ती बनवली जाणार आहे. मूर्तीमध्ये 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे रामाचे रूप दाखवण्यात येणार आहे. रामनवमीला भगवान सूर्य स्वतः रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करतील. यासाठी शास्त्रज्ञांनी पूर्ण तयारी केली आहे. या प्रक्रियेला सूर्य तिलक असे नाव देण्यात आले आहे. सूर्यदेवाची किरणे रामलल्लाच्या डोक्यावर सुमारे 15 मिनिटे असतील. त्यासाठी केलेले प्रयोग यशस्वीही झाले आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रात बांधल्या जाणाऱ्या रामलल्लाच्या मंदिरात पंचदेव मंदिरही बांधले जाणार आहे. या मंदिरात भगवान गणेश, माँ भवानी, भगवान शंकर, भगवान हनुमान, सूर्यदेव, माता शबरी, जटायू, निषाद राज, अगस्त्य मुनी, ऋषी विश्वामित्र, ऋषी वशिष्ठ, महर्षी वाल्मिकी आणि देवी अहिल्या यांचा समावेश आहे. (हेही वाचा: देशात FM संपर्क व्यवस्थेच्या विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं 91 नवीन 100 व्हॅट एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन)
या मंदिराच्या बांधकामाबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल सांगतात की, पंचदेव मंदिर तीन टप्प्यात बांधले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा पाया रचण्यात आला आहे. पंचदेव मंदिराच्या बांधकामानंतर भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालता येणार असून पंचदेव मंदिरातही पूजा करता येणार आहे. या मंदिराचे बांधकाम मंदिराच्या परिसरातच करायचे आहे. मंदिराचे बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.