Rajya Sabha Election 2020: राज्यसभेच्या 24 जागांसाठी 19 जूनला मतदान
Election Commission of India (ECI). (Photo Credits: IANS)

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 24 जागांसाठी येत्या 19 जूनला निवडणूक पार पडणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) सोमवारी (1 जून 2020) रात्री ही घोषणा केली. राज्यसभा निवडणूक 2020 (Rajya Sabha Election 2020) मार्च महिन्यातच होणार होत्या. मात्र, कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन या कारणांमुळे होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या तर काही ठिकाणी निवडणूक कार्यक्रम स्थगित केला होता. दरम्यान, अतिरिक्त जागांसाठीही निवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ज्या सदस्यांचा कार्यकाळ जून आणि जुलै महिन्यात समाप्त होत आहे, अशा रिक्त जागांसाठीही ही निवडणूक असेल. या निवडणुकीचा निकाल मतदानादिवशीच जाहीर केला जाणार आहे.

राज्यसभेच्या अतिरिक्त जागांमध्ये कर्नाटक- 4, अरुणाचल प्रदेश आणि मिजोराम राज्यातील प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेशमधून रिक्त होणाऱ्या जागेसाठी सदस्याचा कार्यकाळ 23 जून रोजी संपतो आहे. तर कर्नाटकच्या 4 जागांसाठीच्या सदस्यांचा कार्यकाळ 25 जून रोजी समाप्त होत आहे. कर्नाटकमधून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राजीव गौडा आणि बी. के. हरिप्रसाद यांचा समावेश आहे. मिजोराममधून रिक्त होणाऱ्या जागेसाठीच्या सदस्यांचा कार्यकाळा 18 जुलै रोजी समाप्त होतो आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2020: महाराष्ट्रातून सातही उमेदवार बिनविरोध; रामदास आठवले, शरद पवार, उदयनराजे भोसले, राजीव सातव यांसह दिग्गजांचा समावेश)

दरम्यान, निवडणूक आयोगाने 17 राज्यांतून राज्यसभेच्या 55 जागा भरण्यासाठी 6 मार्च रोजी एक अधिसूचना जारी केली होती. त्यासाठी 26 मार्च रोजी मतदान होणार होते. तर त्यासाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याची तारिख 13 मार्च होती. अर्ज मागे घेण्याच्या तारखेस म्हणजेच 18 मार्च या दिवशी 37 उमेदावारांची नावे घोषीत करण्यात आली. वरिष्ठ सभागृहात पाठवण्यासाठी ज्या नावांची घोषणा झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले या दोन महाराष्ट्रीय नेत्यांसह राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याही नावाचा समावेश आहे.

ट्विट

दरम्यान, उर्वरीत 18 जागांसाठीची निवडणूक कोविड 19 महामारीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती. या 18 जागांमध्ये आंध्रप्रदेश आणि गुजरात प्रत्येकी 4, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड प्रत्येकी 2 तर मणिपूर आणि मेघालय या राज्यांतून असलेल्या प्रत्येकी 1 एशा 18 जागांचा समावेश आहे. या सर्व जागांसह 6 अतिरिक्त जागांसाठीही निवडणूक होणार आहे.