Rajasthan ULB Election Results 2020: कमळावर पडला हात भारी, राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसची सरशी, भाजपची पिछेहाट
BJP-Congress | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजस्थानमधील 12 जिल्ह्यांमधील सुमारे 50 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (Congress) पक्षाचा हात भाजपच्या (BJP ) कमळावर भारी पडला आहे. 50 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी झालेल्या 1775 जागांपैकी 620 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर भाजप 548 जागांवर अडकला आहे. याशिवाय बसपा 7, भाकप आणि माकप प्रत्येकी 2, आरएलपी 1 तर595 जागांवर अपक्ष उमेदवार ( Independent Candidates ) विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला दुसऱ्या क्रमांकाचे स्थानही पटकावता आले नाही.

राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल क्रमवारीतच सांगायचा तर 620 जागा जिकंत काँग्रेस प्रथम क्रमांकावर. 595 जागा जिंकत अपक्ष दुसऱ्या तर 548 जागा जिंकत भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्ह्यांतील 50 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा निकाल (43 नगरपालिका आणि 7 नगर परिषदा) रविवारी (13 डिसेंबर) जाहीर केला. (हेही वाचा, Maha Vikas Aghadi: संजय राऊत यांच्या 'या' वक्तव्यावरून महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता)

राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा निकाल जाहीर करताना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त पी एस मेहरा यांनी सांगितले की, 1775 वॉर्डांमध्ये काँग्रेस 620, अपक्ष 595, भाजप 548, बसपा 7, भाकप आणि माकप प्रत्येकी 2, आरएलपी एका जागेवर निवडूण आले.

मेहरा यांनी पुढे बोलताना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सोमवारी (14 डिसेंबर 2020) अधिसूचना जारी होईल. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार (15 डिसेंबर) दुपारी 3 वाजलेपासून सुरु होईल. दाखल अर्जांची छाननी बुधवारी (16 डिसेंबर) होईल, छाननीत राहिलेले अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार (17 डिसेंबर) अखेर असेल. तसेच अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच उमेदवारांना चिन्ह वाटप (गुरुवार, 17 डिसेंबर) होईल.

दरम्यान, अध्यक्ष पदासाठी मतदान 20 डिसेंबरला सकाळी 10 ते 2 या काळात होईल. त्यानंतर काही वेळातच मतमोजनी होईल. याच पद्धतीने उपाध्यक्षांची निवडही 21 डिसेंबरला होईल.