COVID-19 Pandemic मध्ये राजस्थान मधील शेतकऱ्यांवर 'टोळधाडी'चे संकट; गुजरात मधील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
Locusts swarm attacking vegetation | (Photo Credits: AFP) Representational image

कोरोना व्हायरसचे संकट देशावरील प्रभाव अधिक वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यात आता आणखी एका समस्येची भर पडली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रातांतून मोठ्या प्रमाणावर आलेल्या किटाणूंमुळे बारमेर, जालोर, जेसलमेर आणि जोधपूर या प्रातांतील शेतकरी हवालदिल झाले आहे. टोळधाडीपासून पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. गेल्या 26 वर्षातील ही सर्वात मोठी टोळधाड असल्याचे म्हटले जात आहे. या टोळधाडीमुळे हिरव्या पालेभाज्या, बाजरी यांसारख्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टोळधाडीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारचे पिकांचे नुकसान गेल्या वर्षी देखील बारमेर, जालोर आणि जेसलमेर जिल्ह्यांत झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा झालेले नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असू शकते. यावर्षी रब्बी आणि खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे.

गुजरात राज्याला Union Agriculture Ministry च्या लोकस्ट कंट्रोल ऑफिस यांच्या तर्फे टोळधाडीमुळे पिकांचे नुकसान होऊ शकते, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Business Standard च्या रिपोर्टनुसार, टोळधाडीमुळे हानी झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आणि जंतुनाशकांच्या आवश्यक पुरवठ्याची हमी देण्यासाठी बनासकांठा येथे 33, पाटण मधील 15, मेहसाणा येथे 10 टीम्स तैनात केल्या आहेत.

रताळे, कलिंगड, भुईमुग, हिरव्या पालेभाज्या आणि फळे यांसारख्या उन्हाळ्यातील पिकांचे अधिक नुकसान होण्याची चिंता रिसर्चने वर्तवली आहे. त्यामुळे टोळधाडची चाहुल लागताच अधिकाऱ्यांना सूचित करण्याचे गावकऱ्यांना सांगण्यात आले आहे.