Raj Thackeray Ayodhya Visit: भाजपामध्ये दोन प्रवाह, एकीकडे MP Brij Bhushan Sharan Singh चा विरोध असताना MP Lallu Singh स्वागताला सज्ज
Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) 5 जूनच्या अयोद्धा दौर्‍याला एकीकडे विरोध करत असताना चलो अयोध्या महाभियान रॅली चं आयोजन करून भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग (MP Brij Bhushan Sharan Singh) यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे भाजपाचेच लल्लू सिंग ( MP Lallu Singh) यांनी मात्र राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी दर्शवली आहे. 'जर कोणी प्रभू श्रीरामांच्या पायी शरण येत असेल, त्यांच्या दर्शनासाठी येत असेल तर आम्ही एक अयोद्धा वासी म्हणून त्यांचं स्वागतच करू' असे लल्लू सिंग म्हणाले आहेत. सोबतच त्यांनी आपण प्रार्थना करतो की श्रीराम प्रभू राज ठाकरेंना सद्बुद्धी देवो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे कल्याण करावे.

लल्लू सिंग हे भाजपाचे फैजाबादचे खासदार आहेत. हनुमानाची कृपा राज ठाकरेंवर झाली आहे म्हणून ते आता प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोद्धेत येत असल्याचं लल्लू सिंग म्हणाले आहेत. आणि श्रीरामांच्या दर्शनासाठी येणार्‍यांचे स्वागत होईल असेदेखील म्हणाले आहेत. नक्की वाचा: Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray: भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, तीव्र शब्दांत टीका .

दरम्यान महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंच्या अयोद्धा दौर्‍यावर चर्चा होत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे शहनवाझ हुसेन आज खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मार्फत ब्रिजभूषण यांची मनधरणी केली जात आहे का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण ब्रिजभूषण यांच्याशी बोलणी करणार नसल्याचं म्हटलं आहे. पण प्रभू रामाच्या दर्शनाला कुणाची आडकाठी असू नये अशी भावना देखील व्यक्त केली आहे.

दरम्यान ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून राज ठाकरेंनी किमान उत्तर प्रदेशच्या साधुमहंतांची माफी मागावी, साधुंनी राज ठाकरेंना माफ केल्यास आपणही माफ करू आणि अयोद्धा दौर्‍याचा मार्ग मोकळा करू असं म्हटलं आहे.

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत 'कारसेवकांनी' पाडलेल्या वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणात ब्रिजभूषण यांंचे नाव आरोपींच्या यादीमध्ये होते.