संसदेत सादर करण्यात आलेल्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालात रेल्वेविषयी (Indian Railway) मोठी माहिती समोर आली आहे. रेल्वेचे ऑपरेटिंग गुणोत्तर (Operating Ratio) सातत्याने वाढत आहे. 2017-2018 मध्ये हा खर्च वाढून, दहा वर्षांच्या उच्चांकी म्हणजेच 98.44 टक्क्यांपर्यंत पोहचला. म्हणजेच 100 रुपये मिळवण्यासाठी रेल्वेने तब्बल 98.44 रुपये खर्च केले आहेत. कॅगच्या अहवालानुसार 2015- 2016 मध्ये रेल्वेचे ऑपरेटींग गुणोत्तर 90.49 टक्के आणि 2016 - 2017 मध्ये 96.5 टक्के इतके होते. मागच्या वर्षी रेल्वेच्या ऑपरेटिंग खर्चात प्रचंड वाढ झाल्याने हा खर्च वाढला आहे.
या अहवालानुसार, 2017—18 मध्ये भारतीय रेल्वेचा एकूण खर्च 2 लाख, 68 हजार 759.62 कोटी रुपयांवरून वाढून, 2 लाख 79 हजार 249.50 कोटी रुपये झाला। यामध्ये भांडवली खर्च 5.82 टक्क्यांनी घटला आहे, तर महसूल खर्चामध्ये 10.47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्मचार्यांच्या खर्चावर, पेन्शन पेमेंट्स आणि ट्रेनच्या डब्यातील गोष्टींवर खर्च केल्याने एकूण खर्चाच्या 71 टक्के रक्कम खर्च झाली आहे. (हेही वाचा: प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांमधून रेल्वेची 1 करोड पेक्षा जास्त कमाई, आरटीआयच्या अहवालामधून खुलासा)
कॅगच्या अहवालात सूचित करण्यात आले आहे की, एकूण उत्पन्न आणि अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, रेल्वेने अंतर्गत महसूल वाढविण्यासाठी काही ठोस उपाययोजना करावी. गेल्या दोन वर्षांत आयबीआर-आयएफअंतर्गत जमा झालेला निधी रेल्वेला खर्च करता आला नाही. या अहवालात असे म्हटले आहे की, अतिरिक्त खर्च कमी करून फायदा प्राप्त करण्यासाठी रेल्वेने बाजारातून प्राप्त झालेल्या निधीचा पूर्ण वापर योग्य प्रकारे सुनिश्चित केला पाहिजे.