Pulwama Terror Attack: पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची चहुबाजूने कोंडी करण्याच्या तयारी असलेल्या सरकारने आता पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानची पाणी कोंडी करणार, हे केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जाहीर केल्यानंतर जलसंपदा मंत्रालयाने त्यासाठीचा आराखडा देखील जाहीर केला आहे. यात पाकिस्तानचे पाणी कसे रोखता येईल यावर उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. भारताने पाणीकोंडी केली तरी आम्हाला फरक पडत नाही- पाकिस्तानची प्रतिक्रीया
सिंचन प्रकल्पातून असे अडवणार पाकिस्तानचे पाणी
शाहपूरकंडी प्रकल्पात थेन जलविद्यूत प्रकल्पातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील 37 हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येईल. या प्रकल्पाचे काम जम्मू-काश्मीर आणि पंजाब राज्यातील वादामुळे स्थगित होते. मात्र 8 सप्टेंबर 2018 पासून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
रावी नदीची उपनदी उझ नदीवर हा प्रकल्प बांधण्यात येत असून यात 781 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्यात येत आहे. याचा वापर सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी करण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत बंधारा बांधत पाणी इतर ठिकाणी वळविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे सिंधू जलवाटप करारातील सर्व पाणी भारताला वापरता येईल. या प्रकल्पासाठी सुमारे 5850 कोटींचा खर्च येणार आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी?
पाणी कोंडीबद्दल केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पाकिस्तानला होणार पाणी पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही पूर्वेकडील नदीच्या प्रवाहात बदल करु आणि या पाण्याचा वापर काश्मीर-पंजाबमधील नागरिकांसाठी करु."
पुढे ते म्हणाले की, "सिंधू जल कराराअंतर्गत रावी, बियास आणि सतलुज या नद्यांचे प्रवाह बदलून पाणी यमुना नदीत वळविण्यात येईल. यापूर्वी हे पाणी पाकिस्तानला मिळत होते. पाण्याचा मार्ग वळवल्याने जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा समवेत अनेक राज्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल. या प्रकल्पावर सध्या आम्ही काम करत आहोत."
पाकिस्तानची बेफिकरी
भारताने पूर्वेकडील नद्यांचे पाणी रोखले तर त्याचा पाकिस्तानवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण या नद्या सिंधु करारानुसार भारताच्या अख्यारीत आहेत. भारताने या नद्यांचे पाणी वळवून भारतीय नागरिकांसाठी वापरले किंवा इतर कोणत्याही कामासाठी त्याचा वापर केल्यास आम्हाला त्याची काही पर्वा नाही, असे पाकिस्तानाचे जल संधारण मंत्रालयाचे सचिव ख्वाजा शुमैल यांनी म्हटले आहे.