Pulwama Terror Attack: भारताने पाणीकोंडी केली तरी आम्हाला फरक पडत नाही- पाकिस्तानची प्रतिक्रीया
Pakistan reaction after India decide not to share river water (Photo Credit-PTI/ Wikimedia Commons)

Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. याच दरम्यान पाकिस्तानविरुद्ध कठोर पाऊल उचलायला भारताने सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानाला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन नद्यांचे पाणी रोखले आहे. भारताकडून पाकिस्तानच्या होणाऱ्या पाणीकोंडीवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रीया आली आहे. रावी, सतलज आणि ब्यास या तीन नद्यांच्या प्रवाहात बदल केल्यास आम्हाला त्याची चिंता नाही, असे पाकिस्तानाचे जल संधारण मंत्रालयाचे सचिव ख्वाजा शुमैल (Khawaja Shumail) यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन ला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा शुमैल यांनी सांगितले की, "भारताने पूर्वेकडील नद्यांचे पाणी रोखले तर त्याचा पाकिस्तानवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण या नद्या सिंधु करारानुसार भारताच्या अख्यारीत आहेत. भारताने या नद्यांचे पाणी वळवून भारतीय नागरिकांसाठी वापरले किंवा इतर कोणत्याही कामासाठी त्याचा वापर केल्यास आम्हाला त्याची काही पर्वा नाही. आयडब्ल्यूटी (Indus Waters Treaty) असे करण्याची परवानगी देते."

पुलवामा दहशतवाही हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानची पाणी कोंडी सुरु केली होती. यासंदर्भात केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पाकिस्तानला होणार पाणी पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही पूर्वेकडील नदीच्या प्रवाहात बदल करु आणि या पाण्याचा वापर काश्मीर-पंजाबमधील नागरिकांसाठी करु." मुंबई लोकलवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा

पुढे ते म्हणाले की, "सिंधू जल कराराअंतर्गत रावी, बियास आणि सतलुज या नद्यांचे प्रवाह बदलून पाणी यमुना नदीत वळविण्यात येईल. यापूर्वी हे पाणी पाकिस्तानला मिळत होते. पाण्याचा मार्ग वळवल्याने जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा समवेत अनेक राज्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल. या प्रकल्पावर सध्या आम्ही काम करत आहोत."