मुंबई लोकलवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा
Mumbai Railway High Alert (Photo credits: PTI)

दहशतवादी अनेकदा हल्ल्यासाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांना लक्ष्य करतात. पुलवामा येथील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी येत्या तीन महिन्यांत मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे रेल्वेने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत हाय अलर्ट जारी केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद कडून अजून एका मोठ्या हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा

सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसतील. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्याबरोबरच संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करणे, लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम करणे अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस वर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. या मेल एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं. तर हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला. मात्र त्यानंतर विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना चिंतेचे वातावरण निर्माण करत आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर ठाण्यात काशिमिरा परिसरात एका संशयित व्यक्तीने प्लॅस्टिकचा बॉल फेकून स्फोट घडवून आणला. त्यानंतर पेण येथील आपटा परिसरात बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आपडल्याने एकच खळबळ उडाली होती. यासोबतच कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.