ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

काश्मिरमध्ये 14 फेब्रुवारी  दिवशी  पुलवामा (Pulwama) येथे  झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्येच महाराष्ट्रातील कर्जत-आपटा (Apta)  या भागातील राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसमध्ये (ST Bus)  बॉम्बसदृश्य (Bomb) वस्तू सापडल्याने खळबळ उडाली होती. चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान दाखवल्याने वेळीच ही वस्तू निकामी करण्यामध्ये रायगड पोलिसांना (Raigad Police) यश आलं आहे. Blast in Thane: काशिमिरा परिसरात सौम्य स्वरूपाचा ब्लास्ट, स्फोटक भरलेला प्लॅस्टिक बॉल फेकल्याचा बाइकर्सचा दावा

बुधवार, 20 फेब्रुवारीच्या रात्री 11 वाजल्याच्या सुमारास आपटा गावामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अलिबागहून खास बॉम्बशोधक पथक बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या मदतीने बॉम्ब निकामी करण्यास पोलिसांना यश मिळालं आहे. रात्री पोलिसांनी गावाला घेराव घातल्याने काही काळ छावणीचं स्वरूप आलं होतं.  या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.

पेण आगारातून रात्री नऊच्या सुमारास आपटाकडे जाण्यासाठी बस निघाली. त्याचवेळी बस आपटा येथे पोहचल्यावर बसमध्ये प्रवाशाची पिशवी राहिली असल्याचे वाहकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ती उघडून पहिली असता, प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली.