Public Place Charging Alert (Photo Credits Odisha Police )

ओडिशातील वाढते सायबर गुन्हे (Cyber Crimes) लक्षात घेऊन, राज्य पोलिसांनी गुरुवारी एक सूचना जारी करून लोकांना सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर (Public Charging Stations) फोन चार्ज करू नये असा सल्ला दिला आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने मोबाईल हँडसेटमधून डेटा चोरीला जाण्याच्या भीतीने पोलिसांनी ही सूचना जारी केली आहे. ओडिशा पोलिसांनी ट्विट केले की, ‘सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग स्टेशन, यूएसबी पॉवर स्टेशन इत्यादी ठिकाणी तुमचा फोन चार्ज करू नका. सायबर ठग तुमच्या मोबाइल फोनवरून वैयक्तिक माहिती चोरू शकतात आणि तुमच्या फोनवर मालवेअर इन्स्टॉल करू शकतात.’

'ज्यूस जॅकिंग'द्वारे मोबाईल हँडसेटमधून डेटा चोरी शक्य असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. ते म्हणाके की, ठग/फसवणूक करणारे सार्वजनिक यूएसबी चार्जिंग स्टेशनवर मालवेअर लोड करू शकतात आणि हँडसेट चार्ज होत असताना तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून डेटा चोरू शकतात. पोलिसांनी सांगितले की, बऱ्याच लोकांकडे त्यांचे वैयक्तिक चार्जर आणि पॉवर बँक असतात, परंतु बरेच लोक बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग स्टेशनचा वापर करतात, जे धोकादायक आहे.

यापूर्वी 4 सप्टेंबर रोजीही ओडिशा पोलिसांनी ट्विट करून लोकांना सायबर ठगांपासून सावध केले होते. भुवनेश्वर शहरी जिल्ह्यात 2021 मध्ये 146 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून 2020 मध्ये 108 होती. दुसरीकडे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार महाराष्ट्रात 2018 ते 2021 पर्यंत नोंदवलेल्या एकूण 19,536 सायबर गुन्ह्यांपैकी 6,000 हून अधिक गुन्हे महिलांविरुद्ध झाले आहेत. (हेही वाचा: Shocking! फोन चार्ज करताना बॅटरीचा झाला स्फोट; 8 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू)

याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याची घोषणा केलीहोती. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, विशेषतः कोरोना महामारीनंतर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, कारण मोठ्या संख्येने लोक ऑनलाइन माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यास प्राधान्य देत आहेत.