उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) फरिदपूरमध्ये चार्जिंगवर असलेल्या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट आठ महिन्यांच्या मुलीच्या चेहऱ्याजवळ झाला, ज्यामध्ये रविवारी जिल्हा रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. मुलाच्या आईची प्रकृती गंभीर आहे. हा मोबाईल सहा महिन्यांपूर्वी विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. फोन चार्जिंगसाठी सोलर पॅनलला जोडलेल्या स्विचमध्ये प्लग केला होता. स्फोटाच्या वेळी मुलीची आई कुसुम कश्यप खोलीत नव्हती.
स्फोटाचा मोठा आवाज ऐकून आईने खोलीकडे धाव घेतली असता, मुलगी गंभीररित्या भाजल्याचे दिसून आले. त्यानंतर आईने मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बरेली जिल्ह्यातील फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचुमी गावात राहणारा सुनील कुमार कश्यप हा मोबाईल चार्जिंगला लावून काही कामासाठी बाहेर गेला होता. घरात पत्नीसह दोन वर्षांची आणि आठ महिन्यांची अशा दोन मुली होत्या.
कुसुम दोन्ही मुलींना स्वतंत्र खाटांवर बसवून घरातील कामे करत होती. यादरम्यान 8 महिन्यांच्या मुलीच्या कॉटच्या वरती ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला, त्यामुळे आग लागल्यावर कॉटवर झोपलेल्या या मुलीला खूप भाजले. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रविवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नसून, पालकांच्या निष्काळजीपणाचे हे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: UP Shocker: प्रसूतीनंतर महिला भरू शकली नाही रुग्णालयाची फी; डॉक्टरांनी केली नवजात मुलीची विक्री)
मुलीचे वडील सुनील कुमार कश्यप हे मजूर असून, ते वीज नसलेल्या बांधकामाखालील घरात राहतात. त्यांचे कुटुंब मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी, लाईटसाठी सोलर प्लेट्स आणि बॅटरी वापरतात. दरम्यान, याआधी दिल्ली एनसीआरमध्ये रेडमीच्या फोनच्या स्फोटामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका YouTuber ने सोशल मीडियावर दावा केला आहे की, तिची आंटी बेडवर झोपली असताना, शेजारी ठेवलेल्या Redmi 6A स्मार्टफोनचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये महिलेचा मृत्यू झाला. कंपनीने या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचे म्हटले आहे.