उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शाहजहांपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरवर एका नवजात हिंदू मुलीची पैशासाठी विक्री केल्याचा आरोप आहे. हिंदू संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनही सतर्क झाले आणि मुलीला तिच्या जन्मदात्या आईच्या ताब्यात देण्यात आले. त्याचबरोबर रुग्णालयही सील करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपीच्या शाहजहांपूरमधील 'नवजीवन हॉस्पिटल'च्या डॉ. अशोक राठौरवर आपल्या नवजात हिंदू मुलीला काही पैशाच्या लालसेने मुस्लिम कुटुंबाला विकल्याचा आरोप आहे.
हिंदू संघटनांना याची माहिती मिळताच त्यांनी याविरोधात गदारोळ केला आणि त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण मिटवले. नवजात मुलीच्या वडिलांचे नाव रमाकांत असून ते आधीच 5 मुलींचे वडील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक दुर्बल असलेल्या त्रिलोकपूर येथील रहिवासी रमाकांत यांची पत्नी संगीता यांची प्रसूती झाली. पोलीस ठाण्यासमोरील नवजीवन रुग्णालयात सहाव्या अपत्याचा जन्म झाला. आधीच पाच मुली असल्याने रुग्णालयातील डॉ.अशोक राठोड यांनी संगीता यांना फसवून मुलगी देण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
बाळाच्या बदल्यात हॉस्पिटलचा खर्च घेतला जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. याबाबत महिलेने नकार दिल्यावर डॉक्टरांनी रमाकांतला नवजात मुलगी परत करण्याऐवजी, ती दुसऱ्या समाजातील व्यक्तीला विकण्यास सांगितले. याची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे नेते राजेश अवस्थी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयासमोर निदर्शने केली. राजेश अवस्थी यांनी सांगितले की, डॉ.अशोक राठोड याने एका गरीब हिंदू दाम्पत्याच्या नवजात मुलीची एका मुस्लिम दाम्पत्याला पैशांच्या लालसेने विक्री केली. (हेही वाचा: Rajasthan Shocker: घरातील शेळी विकून वाढदिवस साजरा करत होता मुलगा; आईने अडवले असता हातोडा डोक्यात घालून केली हत्या)
विरोध केल्यानंतर मुलीला परत करण्यात आले. मुलीला दत्तक घेतलेल्या कुटुंबाचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेतील आरोपी डॉक्टर सध्या फरार आहे. हिंदू नेत्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या प्रकरणाची माहिती प्रशासनाला दिली असून डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी एसओ रवींद्र सिंह यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. रमाकांत यांच्या वतीने डॉ. अशोक राठोड आणि नवजीवन रुग्णालयातील इतर कर्मचार्यांवर भादंवि कलम 342 आणि बाल न्याय कायद्यांतर्गत कलम 81 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.