Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

राजस्थानमधील (Rajasthan) झालावाडमधून (Jhalawar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची हत्या केली आहे. एवढेच नाही तर हत्येनंतर मुलाने आईचा मृतदेह घरात ठेवलेल्या पेटीत बंद करून तेथून पळ काढला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस या अल्पवयीन मुलाचा शोध घेत आहेत. रिपोर्टनुसार, ही घटना जिल्ह्यातील सुनेल पोलीस स्टेशन हद्दीतील सेमला गावातील आहे.

मृत महिलेचा पती बलराम मेघवाल याने सांगितले की, तो गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी कामावरून शेजारच्या गावात गेला होता. त्याच दिवशी त्यांच्या 15 वर्षांच्या मुलाचा वाढदिवसही होता. मुलाला वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत पार्टी करायची होती, पण त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने घरातील बकरी पाच हजार रुपयांना विकली. आरोपीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार बाजारात एका बकरीची किंमत 11 हजार रुपये आहे.

बकरी विकल्यानंतर मुलाच्या आईने मुलाला खडसावले आणि पैसे मागितले. यावर मुलाने बकरी विकून मिळालेल्या पैशांची पार्टी केल्याचे सांगितले. या गोष्टीच्या रागाने आईने मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाने खोलीत ठेवलेल्या हातोड्याने आईच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने मुलाने आईचा मृतदेह घरात ठेवलेल्या पेटीत बंद करून तेथून पळ काढला.

संध्याकाळी बलरामने आपल्या पत्नी आणि मुलाचा शेतात, घरात आणि परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु ते कुठेच सापडले नाहीत. यानंतर त्याने नातेवाईक व ग्रामस्थांकडे चौकशी केली असता त्याच्या मुलाने बकरी विकून पार्टी केल्याचे समोर आले. काही वेळाने त्याला घरातील पेटीत बायकोचा मृतदेहही आढळला. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. (हेही वाचा: UP Shocker: नवऱ्याने दाताने तोडला बायकोच्या नाकाचा लचका; मांसाचा तुकडा घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात, जाणून घ्या कारण)

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. माहिती मिळताच एफएलएस (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. त्याचवेळी पोलीस अधिकारी दिनेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा खून अल्पवयीन मुलाने एकट्याने केला आहे की त्याच्या मित्रांनीही त्याला या कामात मदत केली आहे, याची चौकशी केली जाईल. पोलीस या अल्पवयीन मुलाच्या मित्रांचाही शोध घेत आहेत.