Bareilly Factory Blast: बरेली जिल्ह्यातील सिरौली भागात काल फटाका बनवणाऱ्या युनिटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या घटनेतील मृतांची संख्या पाच झाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) अनुराग आर्य यांनी या घटनेत निष्काळजीपणा केल्याबद्दल चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारीला हटवून पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आमला उपजिल्हा दंडाधिकारी (एसडीएम) एन. राम यांनी सांगितले की, सिरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणपूर गावात बुधवारी संध्याकाळी फटाक्यांच्या उत्पादन युनिटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेत हसन (४) आणि शाहजान (५) या दोन मुलांचे मृतदेहही रात्री उशिरा ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या पाच झाली आहे. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. तोही ढिगाऱ्याखाली दबला गेला असण्याची शक्यता आहे.
बरेलीतील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
बुधवारी संध्याकाळीच अपघातात तबस्सुम (44), रुखसाना (28) आणि एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले की, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रत्येक ठिकाणी तपास करत आहेत. स्थानिक बचाव पथकांसोबत राज्य आपत्ती बचाव दल (SDRF) देखील बचाव कार्यात गुंतले आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, सिरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणपूर गावात बुधवारी दुपारी ४ वाजता फटाका निर्मिती युनिटमध्ये झालेल्या स्फोटात जवळपासच्या काही इमारतींचेही नुकसान झाले. युनिट ऑपरेटर नसीरच्या परवान्याची चौकशी सुरू आहे. एसएसपी आर्य यांनी उपनिरीक्षक देशराज सिंह, नाहर सिंग, कॉन्स्टेबल अजय आणि सुरेंद्र यांच्यासह चार पोलिसांना निष्काळजीपणासाठी निलंबित केले आहे. याशिवाय सिरौली पोलीस ठाण्याचे प्रभारी रवी कुमार यांना हटवून पोलीस लाईनमध्ये पाठवण्यात आले असून क्षेत्र अधिकारी गौरव सिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.