संयुक्त राष्ट्राने (UN) मंगळवारी गरिबी (Poverty) निर्मूलनात जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. संयुक्त राष्ट्राने म्हटले की, भारतामध्ये 2005/2006 ते 2019/2021 या अवघ्या 15 वर्षांत एकूण 41.5 कोटी लोक गरिबीच्या दलदलीतून बाहेर आले आहेत. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऑक्सफर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) द्वारे जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक (MPI) चे हे नवीनतम अद्यतन जारी केले गेले.
या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतासह 25 देशांनी 15 वर्षात त्यांचा जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक यशस्वीरित्या निम्म्यावर आणला आहे. यावरून जलद विकास शक्य असल्याचे दिसते. या देशांमध्ये कंबोडिया, चीन, काँगो, होंडुरास, भारत, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. गरिबी कमी करण्यात यश मिळविलेल्या देशांच्या यादीत 17 देश आहेत.
भारतामध्ये 2005-2006 मध्ये, सुमारे 64.5 कोटी लोकांचा दारिद्र्य यादीत समावेश करण्यात आला होता, 2015-2016 मध्ये ही संख्या सुमारे 37 कोटी आणि 2019-2021 मध्ये 23 कोटी इतकी कमी झाली. अहवालानुसार, भारतातील सर्व निर्देशकांमध्ये गरिबीत घट झाली आहे. अहवालानुसार, भारतातील पोषण निर्देशकांखाली बहुआयामी गरीब आणि वंचित लोकांची संख्या 2005-2006 मधील 44.3 टक्क्यांवरून 2019-2021 मध्ये 11.8 टक्क्यांवर आली आहे. या काळात बालमृत्यूचे प्रमाण 4.5 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांवर आले. (हेही वाचा: Bengaluru: चोरट्यांनी पाठलाग करून लुटला टोमॅटोने भरलेला ट्रक; पोलिसांनी दाखल केला गुन्हा)
अहवालानुसार, भारतात स्वयंपाकाच्या इंधनापासून वंचित राहिलेल्या गरिबांची संख्या 52.9 टक्क्यांवरून 13.9 टक्क्यांवर आली आहे. जिथे 2005-2006 मध्ये 50.4 टक्के लोक स्वच्छतेपासून वंचित होते, त्यांची संख्या 2019-2021 मध्ये 11.3 टक्क्यांवर आली आहे. पिण्याच्या पाणी उपलब्ध असणाऱ्या लोकांची संख्या 16.4 टक्क्यांवरून 2.7 वर आली आहे. विजेशिवाय राहणाऱ्या लोकांची संख्या 29 टक्क्यांवरून 2.1 टक्क्यांवर आली आणि घर नसलेल्या गरीबांची संख्या 44.9 टक्क्यांवरून 13.6 टक्क्यांवर आली.