
Narendra Modi No Confidence Motion Speech: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन I.N.D.I.A. अर्थात विरोधी पक्षांची आघाडीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. ज्यावर पाठिमागील दोन दिवसांमध्ये जवळपास 18 तासांची चर्चा सुरु आहे. आतापर्यंत काँग्रेस खासदार गौरव गोगोई, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी, किरण रिजीजू यांसारख्या मंत्री आणि खासदारांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (10 ऑगस्ट) या प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. मणिपूर हिंसाचार आणि केंद्र सरकारवर झालेले आरोप यांवर पंतप्रधान काय बोलतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
सरकार भक्कम उत्सुकता फक्त पंतप्रधानांच्या भाषणाची
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, विरोधकांकडून दखल अविश्वास प्रस्तावास उत्तर देण्यासाठी पंतप्रधान संसदेत गुरुवारी उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या वृत्ताची पुष्टी केली आहे. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी 26 जुलै रोजी स्वीकारला. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी या प्रस्तावावर सभागृहात चर्चा सुरु झाली. जवळपास सर्वच पक्षांनी या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. प्रचंड बहुमत असल्याने मतदान झाले तरी सरकार कायम राहील. बहुमताच्या जोरावर भक्कम असल्याने सरकारला कोणताच धोका नाही. त्यामुळे आता उत्सुकता केवळ पंतप्रधान काय बोलतात याचीच आहे.
लोकसभेतील संख्याबळ अर्थात सत्ताधारी, विरोधी आघाडीची बलाबल
NDA- 331
I.N.D.I.A.- 144
अविश्वास प्रस्ताव कोण आणू शकते?
लोकसभा सभागृहातील 50 सदस्यांचा पाठिंबा असलेला कोणताही खासदार (सभागृहातील) केंद्रीय मंत्रिमंडळाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतो. खासदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर हा प्रस्ताव कधीही दाखल करता येऊ शकतो. फक्त एकदा अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर पुढचे सहा महिने सरकारविरोधात कोणत्याही प्रकारे अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही. दरम्यान, लोकसभा अध्यक्षांनी प्रस्तावि स्वीकारल्यानंतर या प्रस्तावाला पाठिंबा देणारे खासदार सरकारच्या उणिवांवर प्रकाश टाकतात. ट्रेझरी बेंच त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना प्रतिसाद देतात. शेवटी, मतदान होते आणि प्रस्ताव यशस्वी झाल्यास म्हणजेच प्रस्तावाच्या बाजूने अधिक ते मिळाल्यास सरकार कोसळते.