कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे जगभरातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांच्यात सोमवारी रात्री फोनवर दीर्घ संभाषण झाले. या दोन्ही नेत्यांनी कोरोना विषाणू संसर्ग, औषधे आणि लस तयार करण्यासाठी कच्च्या मालाचा अखंडित पुरवठा यासह अनेक बाबींवर चर्चा केली. कोव्हिशिल्ड लसीसाठी कच्चा माल भारतास पुरवण्यास अमेरिकेने संमती दिली होती. या संभाषणानंतर पीएम मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली की, अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांच्याशी फलदायी चर्चा झाली.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रविवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोरोना साथीच्या सुरूवातीस जेव्हा आमची रुग्णालये पूर्ण भरली होती त्यावेळी भारताने अमेरिकेला मदत पाठविली होती, त्याच प्रकारे आम्ही देखील जेव्हा गरज असेल तेव्हा भारताला मदत करू.’
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, 'आम्ही दोन्ही देशांमधील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबाबत सविस्तर चर्चा केली. भारताची अमेरिकेने मदत केल्याबद्दल मी अध्यक्ष बिडेन यांचे आभार मानले.' दुसर्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले की, 'अध्यक्ष जो बिडेन यांनी कोरोना व्हायरस लसीसाठी कच्चा माल आणि औषधांचा अखंड प्रभावीपणे पुरवठा करण्याचा पुनरुच्चार केला. भारत-अमेरिकेच्या आरोग्यसेवा भागीदारीमुळे कोरोना विषाणू या जागतिक महामारीशी लढा देता येईल.'
Had a fruitful conversation with @POTUS @JoeBiden today. We discussed the evolving COVID situation in both countries in detail. I thanked President Biden for the support being provided by the United States to India.
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2021
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूतांनी सोमवारी सांगितले की, कोविड-19 च्या 'भयावह' स्थितीचा सामना करणार्या भारताच्या मदतीसाठी वॉशिंग्टन 24 तास काम करेल आणि तो लसीसाठी कच्चा माल, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उत्पादन पुरवठा आणि लसीकरणाच्या विस्तारासाठी आर्थिक सहाय्य यासह अनेक पद्धतीने मदतीचा हात पुढे करेल. (हेही वाचा: देशातील निवडणुकांमुळे वाढला कोरोनाचा संसर्ग? 'कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेसाठी फक्त Election Commission जबाबदार'- Madras High Court)
अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये 70 वर्षांची आरोग्यसेवा भागीदारी आहे. त्याअंतर्गत पोलिओ अभियान, एचआयव्ही, स्मॉल पॉक्सविरूद्ध लढा दिला. आता दोन्ही देश जागतिक महामारी कोरोना विषाणूविरूद्ध एकत्र लढतील. दरम्यान, भारतातील या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इतर अनेक देश कोरोनाशी लढण्यासाठी औषधे, हेल्थकेअर, कच्चा माल आणि पायाभूत सुविधा व वैद्यकीय पथके पाठविण्याची ऑफर देत आहेत.