Prime Minister Narendra Modi (Image/ANI)

PM Modi Foreign Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी घाना (India Ghana Relations), त्रिनिदाद आणि टोबैगो, अर्जेंटिना, ब्राझील (BRICS Summit Brazil) आणि नामिबिया या पाच देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी (Narendra Modi International Tour) रवाना झाले. हा दौरा 2 ते 9 जुलै दरम्यान पार पडणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या दौऱ्याची सुरुवात घाना या देशापासून होणार असून 2–3 जुलै दरम्यान मोदी घानाला भेट देतील. ही भेट घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रमानी महामा यांच्या निमंत्रणावरून होणार आहे. घाना हा ग्लोबल साउथमधील महत्त्वाचा भागीदार असून आफ्रिकन युनियन आणि ECOWAS (इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स) मध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

इतिहासातील संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच गुंतवणूक, ऊर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमतेचा विकास आणि विकास भागीदारी अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरेल. घानाच्या संसदेत भाषण देणे हे माझ्यासाठी सन्मानाचे ठरेल,” असे मोदींनी निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी राष्ट्राध्यक्ष श्रीमती क्रिस्टीन कार्ला कंगलू यांची भेट घेईन, ज्या यंदाच्या प्रवासी भारतीय दिवसाच्या मुख्य पाहुण्या होत्या, तसेच पंतप्रधान श्रीमती कमला पर्साड-बिसेस्सर यांचीही भेट घेईन, ज्या नुकत्याच दुसऱ्यांदा पदावर निवडून आल्या आहेत. 180 वर्षांपूर्वी भारतीय नागरिक प्रथमच त्रिनिदाद आणि टोबैगोमध्ये पोहोचले होते. या दौऱ्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आणि आपुलकीच्या संबंधांना नवी ऊर्जा मिळेल, असे मोदींनी सांगितले.

त्रिनिदाद दौऱ्यानंतर मोदी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स येथे पोहोचतील. ही भारताच्या पंतप्रधानांची 57 वर्षांनंतर होणारी पहिली द्विपक्षीय भेट असेल. अर्जेंटिना हा लॅटिन अमेरिका खंडातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार असून G20 मध्ये तो सक्रिय आहे. राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली यांच्यासोबतच्या चर्चांमध्ये कृषी, महत्त्वाचे खनिज, ऊर्जा, व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यावर भर असेल, असे मोदींनी स्पष्ट केले. 6–7 जुलै रोजी पंतप्रधान मोदी ब्राझीलच्या रिओ दि जानेरियो येथे होणाऱ्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होतील.

नरेंद्र मोदी दौऱ्यावर निघण्यापूर्वी

BRICS संस्थापक सदस्य म्हणून भारत emerging economies मधील सहकार्याचे हे महत्त्वाचे व्यासपीठ मानतो. आम्ही एक शांततापूर्ण, न्याय्य, लोकशाहीप्रधान आणि समतोल बहुपक्षीय जागतिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत. परिषदेच्या अनुषंगाने मी इतर अनेक जागतिक नेत्यांशीही चर्चा करणार आहे. त्यानंतर ब्राझीलच्या ब्राझिलिया शहरात द्विपक्षीय राज्य भेट होणार असून, ती जवळपास 60 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानाची पहिली अधिकृत भेट असेल. या भेटीद्वारे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला द सिल्वा यांच्यासोबत ग्लोबल साउथच्या प्राधान्यांवर चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

मोदींचा अंतिम थांबा नामिबिया असेल, जो भारताचा विश्वासार्ह भागीदार असून दोन्ही देशांना वसाहतवादी शोषणाविरोधात लढ्याचा समान इतिहास आहे. राष्ट्राध्यक्ष डॉ. नेतुम्बो नांदी-एंडैतवाह यांच्यासोबत मी नव्या सहकार्य आराखड्यावर चर्चा करणार आहे. नामिबियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणे हा गौरवाचा क्षण असेल, जे आपल्या मुक्तता, विकास आणि सहकार्यावरील निष्ठेचे प्रतीक ठरेल, असे मोदी म्हणाले.

या संपूर्ण दौऱ्याबाबत मोदी म्हणाले, या पाच देशांच्या भेटीमुळे ग्लोबल साउथमधील आपले मैत्रीपूर्ण संबंध बळकट होतील, अटलांटिकच्या दोन्ही किनाऱ्यांवरील भागीदारी वाढेल, तसेच BRICS, आफ्रिकन युनियन, ECOWAS आणि CARICOM यांसारख्या बहुपक्षीय व्यासपीठांवर आपली भूमिका अधिक दृढ होईल.