
अमरनाथ यात्रेपूर्वी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता केंद्रीय यंत्रणा अॅक्शनमोडमध्ये असून रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख, एनआयएचे डीजी, सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा तसेच सद्यस्थितीत तिथे सुरु असलेल्या दहशतवाद विरोधी कारवायांचा आढावा घेतला. (हेही वाचा - Delhi: अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ संपेपर्यंत या पदावर राहणार)
जम्मू काश्मीरमध्ये या आठवड्यात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. गेल्या रविवारी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सुरू असताना जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर ही बस दरीत कोसळली. यात तीन महिलांसह नऊ जण ठार झाले आणि अन्य 33 जण गंभीर जखमी झाले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 4 दिवसांत दहशतवाद्यांनी 4 हल्ले केले आहेत. रियासी, कठुआ आणि डोडा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. ते परिसरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी कठुआमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
येत्या 29 जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ही यात्रा प्रामुख्याने जम्मू काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम या भागातून जाते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मार्गांच्या सुरक्षेचा आणि या यात्रेच्या नियोजनाचादेखील आढावा घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जवळपास 4.28 लाख लोक या यात्रेत सहभागी झाले. यंदा ही संख्या पाच लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे.