कबूतर (Pigeons) त्याची विष्ठा आणि पिसे यांमुळे मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करु शकतात. खास करुन लहान (Children) मुलांसाठी. एखादा व्यक्ती दीर्घकाळासाठी कबुतराच्या संपर्कात राहिल्यास त्याला फुफ्फुसाचे जुनाट आणि संभाव्य घातक आजार (Lung Disease) होऊ शकतात, असे एका तपासात नुकतेच पुढे आले आहे. खरेतर कबूतर, अनेकदा शांततेचे प्रतीक आणि दीर्घकाळ मानवी सोबती म्हणून ओळखले जाते. शहरांमध्ये, खास करुन मुंबईमध्ये अनेक खासगी निवासी इमारती, शासकीय कार्यालये आणि रस्त्यांवर कंबुदरांचे थवेच्या थवे मुक्काम ठोकून असल्याचे दिसते. गाव-खेड्यांमध्येही अनेक लोक कबुदर मोठ्या आवडीने पाळतात. पण हेच कबूतर मानवी आरोग्यास गंभीर धोके निर्माण करु शकते, असे अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे.
मुलाला श्वासोच्छवासाचा गंभीर आजार
पश्चिम दिल्ली येथील वसुंधरा एन्क्लेव्हमधील एका 11 वर्षीय मुलाला श्वासोच्छवासाचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. त्याला आजार होण्याच्या कारणांचा शोध घेतला गेला तेव्हा हा मुलगा कबुतराची पिसे आणि विष्ठेच्या दीर्घकाळ संपर्कात असल्याचे आढळून आले. सर गंगाराम हॉस्पिटलमधील (Sir Ganga Ram Hospital) एका उल्लेखनीय तपासामध्ये हा धोका अधोरेखित केला. पीडित मुलास सुरुवातीला एक सामान्य खोकला होता. पण पुढे त्याची प्रकृती झपाट्याने बिघडली, ज्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. वैद्यकीय तपासणीत त्याला अतिसंवेदनशीलता न्यूमोनिटिस (एचपी) सारखा दिसणारा फुफ्फुसाचा आजार जडल्याचे निदान करण्यात आले.
कबूतरांची पिसे आणि विष्ठा धोकादायक
रुग्णालयाने म्हटले की, पीडित मुलाला कबूतरांची पिसे आणि विष्ठा यांची तीव्र ऍलर्जी झाली. परिणामी त्याला श्वसनास गंभीर अडथळा निर्माण झाला. परिणामी त्यांला श्वास घेण्यास गंभीर त्रास झाला. न्यूमोनिटिस सामान्यत: प्रौढांमध्ये दिसून येते पण तो 15 वर्षांखालील मुलांना देखील प्रभावित करू शकते. मात्र, अनेकदा त्याचे निदान होत नाही. हा दुर्मिळ बालपण रोग प्रति दशलक्ष मुलांमध्ये फक्त चार प्रकरणांमध्ये आढळतो आणि या वयोगटातील दीर्घकालीन इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) चे एक सामान्य प्रकार आहे.
फुफ्फुसाच्या ऊतींना डाग
इंटरस्टिशियल लंग डिसीजमुळे फुफ्फुसाच्या ऊतींना (पेशींना) अपरिवर्तनीय डाग पडतात. मुलांची हळूहळू स्वतंत्रपणे श्वास घेण्याची क्षमता बिघडते आणि ऑक्सिजन हस्तांतरित करण्याची आणि रक्तप्रवाहातून कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्याची फुफ्फुसांची क्षमता कमी होते. सर गंगाराम हॉस्पिटलच्या बालरोग अतिदक्षता विभागात डॉ. धीरेन गुप्ता यांच्या देखरेखीखाली, मुलावर सखोल उपचार करण्यात आले. डॉ. अनिल सचदेव, डॉ. सुरेश गुप्ता आणि डॉ. नीरज गुप्ता यांच्यासह वैद्यकीय पथकाने हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी आणि स्टिरॉइड्स दिली. उपचारानंतर, मुलाच्या फुफ्फुसाची जळजळ लक्षणीयरीत्या कमी झाली, ज्यामुळे त्याला सामान्यपणे श्वास घेता आला. अभ्यासाच्या उद्देशाने डिस्चार्जनंतर त्याचे निरीक्षण केले जात आहे.
डॉ. गुप्ता यांनी एचपीची लक्षणे लवकर ओळखणे आणि गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी त्वरित कारवाई करण्याच्या महत्त्वावर भर दिला. पक्ष्यांची विष्ठा आणि पिसे यांसारख्या पर्यावरणीय उत्तेजकांबद्दल जागरुकतेची गरजही त्यांनी अधोरेखित केली आणि या पक्ष्यांना होणाऱ्या संभाव्य हानीला कमी लेखू नये असा इशारा दिला. एक्सपोजर धोके कमी करण्यासाठी स्वच्छ वातावरण राखणे आणि योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.