PhonePe Indus Appstore: गुगल प्ले स्टोअरची मक्तेदारी येणार संपुष्टात? फोनपे 21 फेब्रुवारीला लॉन्च करणार इंडस ॲप स्टोअर
PhonePe (Photo Credits-Twitter)

PhonePe Indus Appstore: मोबाईल फोनवर कोणतेही ॲप डाउनलोड करण्यासाठी यूजर्सला नेहमी गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) किंवा ऍपल ॲप स्टोअरवर (Apple App Store) जावे लागते. मात्र आता प्ले स्टोअरवरील गुगलची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. कारण, फोनपे (PhonePe) येत्या 21 फेब्रुवारीला स्वदेशी ॲप स्टोअर लॉन्च करणार आहे. अहवालानुसार, फोनपे इंडस ॲप स्टोअर (Indus Appstore) लॉन्च करणार आहे. फोनपे या नवीन उपक्रमासाठी जोरदार तयारी करत आहे.

कंपनीची वेबसाइट दर्शवते की, त्यांनी Flipkart, ixigo, Domino's Pizza, Snapdeal, JioMart आणि Bajaj Finserv सारखे ॲप्स ऑनबोर्ड केले आहेत. याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये, इंडस ॲप स्टोअरने आघाडीच्या रिअल-मनी गेम डेव्हलपर्स Dream11, Nazara Technologies, Gamescraft आणि Mobile Premier League (MPL) कडील ॲप्स समाविष्ट करण्यासाठी युतीची घोषणा केली होती.

इंडस ॲप स्टोअर अँड्रॉइड डेव्हलपर्सना त्यांचे ॲप्स इंग्रजी व्यतिरिक्त 12 भारतीय भाषांमध्ये सूचीबद्ध करण्याची परवानगी देते, तसेच या भाषांमध्ये त्यांच्या ॲप सूचीमध्ये मीडिया आणि व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी देते. विशेष बाब म्हणजे हे ॲप मार्केटप्लेस गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल ॲप स्टोअरद्वारे आकारल्या जाणाऱ्या 15-30 टक्क्यांच्या तुलनेत ॲपमधील खरेदीवर कोणतेही शुल्क आकारणार नाही. (हेही वाचा: Cyber Fraud in India: गेल्या वर्षी सायबर फसवणुकीमुळे भारतीयांचे 7,488.6 कोटी रुपयांचे नुकसान; यादीत महाराष्ट्र अव्वल)

ऑक्टोबर 2023 मध्ये, फोनपे सांगितले की, प्लॅटफॉर्मवरील ॲप सूची पहिल्या वर्षासाठी विनामूल्य असेल, त्यानंतर ‘नाममात्र’ वार्षिक शुल्क आकारले जाईल. तसेच डेव्हलपर त्यांच्या आवडीचे कोणतेही पेमेंट गेटवे प्लॅटफॉर्मवर समाकलित करण्यास सक्षम असतील, हे ॲप इंडस ॲपस्टोअर वेबसाइटवरही उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. वापरकर्ते येथून त्यांच्या स्मार्टफोनवर ॲप डाउनलोड आणि साइडलोड करू शकतात. या ॲप स्टोअरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते ईमेल खात्यांशिवाय वापरकर्त्यांना मोबाइल नंबर-आधारित लॉगिन सिस्टम देखील ऑफर करेल.