
उत्तर प्रदेशातील महाराजगंज (Maharajganj) जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यांत 111 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृत्यूचे अद्याप ठोस कारण समजू शकलेले नाही. एवढ्या मोठ्या संख्येने नवजात बालकांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त करत महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, यामागची कारणे शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
आता लखनौच्या क्वीन मेरी हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, गरोदर महिलांच्या दुधात कीटकनाशके (Pesticides) सापडली आहेत जी महाराजगंज जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत सुमारे 111 नवजात बालकांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत.
क्वीन मेरी हॉस्पिटलच्या संशोधनात गर्भवती महिलांच्या दुधात कीटकनाशके आढळून आल्याचे समोर आले आहे. अर्भकांच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी 130 शाकाहारी आणि मांसाहारी गर्भवती महिलांच्या चाचण्या घेण्यात आल्या. प्रोफेसर सुजाता देव, डॉ अब्बास अली मेहंदी आणि डॉ नयना द्विवेदी यांनी केलेले संशोधन पर्यावरण संशोधन जनरलमध्ये प्रकाशित झाले आहे.
शाकाहारी महिलांच्या दुधात मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत कमी कीटकनाशके आढळून आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. दुधात कीटकनाशक असण्यामागील कारण रासायनिक शेती आहे, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. हिरव्या भाज्या आणि पिकांवर विविध प्रकारची कीटकनाशके आणि रसायने फवारली जातात. प्राण्यांनादेखील अनेक रासायनिक इंजेक्शन्स टोचली जातात, ज्यामुळे मांसाहार करणाऱ्या स्त्रीच्या दुधात कीटकनाशके तयार होतात. (हेही वाचा: Bihar Shocker: ऑपरेशन करण्यास गेलेल्या महिलेच्या दोन्ही किडन्या चोरीला; पतीही गेला सोडून, जाणून घ्या सविस्तर)
मांसाहार करणाऱ्या महिलेच्या दुधात कीटकनाशकांचे प्रमाण हे शाकाहारी महिलेच्या दुधातील कीटकनाशकांपेक्षा तिप्पट होते. संशोधनात असे म्हटले आहे की नवजात मुल कोणतेही मांस किंवा फळे, भाज्या खात नाही, तरीही कीटकनाशके आईच्या दुधाद्वारे त्याच्या शरीरात पोहोचतात. आईच्या दुधात जी काही प्रमाणात कीटकनाशके असतात, त्यामुळे लहान मुलांचे खूप नुकसान होते.
मुलांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सत्येंद्र कुमार यांनी मुख्य विकास अधिकारी (CDO) गौरव सिंग सोगरवाला यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सीडीओ व्यतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि उपविभागीय दंडाधिकारी असतील. ही समिती बालमृत्यूच्या आकड्यांच्या वाढीची चौकशी करेल आणि मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.