बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूरमधून (Muzaffarpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका डॉक्टरने महिलेच्या दोन्ही किडनी (Kidneys) चोरल्याचा आरोप आहे. महत्वाचे म्हणजे या कठीण काळात महिलेचा नवराही तिला सोडून गेला आहे. पीडित महिला 3 मुलांची आई असून ती सध्या मुझफ्फरपूरच्या एसके मेडिकल कॉलेजमध्ये दाखल आहे. महिला डायलिसिसवर आहे. ती म्हणते की, आता ती आपले शेवटचे दिवस मोजत आहे व म्हणूनच तिला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचे नाव सुनीता आहे आणि तिच्या पतीचे नाव अकलू राम आहे. महिलेने सांगितले की तिला गर्भाशयाशी संबंधित आजार आहे. बरियारपूर चौकाजवळील एका खासगी नर्सिंग होममध्ये तिचे ऑपरेशन झाले होते. मात्र डॉक्टरांनी तिची फसवणूक केली. डॉक्टरांनी तिच्या किडन्या काढल्या आणि नंतर पळून गेला. आता इतरांशी किडनी मॅच होत नसल्याने महिलेचे किडनी प्रत्यारोपणही होत नाही. एवढेच नाही तर तिला या अवस्थेत तीन मुलांसह सोडून पतीही पळून गेला आहे. (हेही वाचा: डॉक्टरांची कमाल! 3 कापलेली बोटे पुन्हा जोडली; पायाच्या बोटापासून बनवला हाताचा अंगठा, दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील घटना)
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी तिचा पती तिच्यासोबत होता. तिची काळजी घेत होता. आपली एक किडनी तिला द्यायलाही तो तयार होता. मात्र पतीची किडनी तिच्याशी जुळली नाही. त्यानंतर मात्र तो तिला सोडून निघून गेला. सुनीता म्हणते की यात तिचा आणि तिच्या मुलांचा काय दोष? तिने सांगितले की, जेव्हा तिची प्रकृती ठीक होती, तेव्हा ती मजुरीचे काम करायची आणि घर चालवायला पतीला मदत करायची. पण आज जर ती स्वतः आजारी असेल तर काय करावे? पतीने तिला जाताना सांगितले की, ती जगो वा मरो आपल्याला काही फरक पडत नाही.